सुका कचरा वेगळा करा अन् खाद्यपदार्थांचे कुपन मिळवा!

By नारायण जाधव | Published: February 28, 2024 07:52 PM2024-02-28T19:52:58+5:302024-02-28T19:53:13+5:30

नवी मुंबई महापालिकेची ' रिसायकल ॲण्ड डाइन ' संकल्पना

Segregate dry waste and get food coupons, Navi Mumbai Municipal Corporation's 'Recycle and Dine' concept | सुका कचरा वेगळा करा अन् खाद्यपदार्थांचे कुपन मिळवा!

सुका कचरा वेगळा करा अन् खाद्यपदार्थांचे कुपन मिळवा!

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानात देशपातळीवर सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. याच बळावर महापालिकेचा सातत्याने राज्य आणि देशपातळीवर गौरव झाला आहे. २०२३-२४ मध्ये स्वच्छ भारत अभियानात तिसरा क्रमांक मिळविल्यानंतर २०२४-२५ पुन्हा एकदा ' निश्चय केला नंबर पहिला ' या आपल्या ब्रीदवाक्याखाली महापालिकेने कंबर कसली आहे. या अंतर्गत ' रिसायकल ॲण्ड डाइन ' नवी संकल्पना महापालिका नव्या वर्षात राबविणार आहे.

या संकल्पनेनुसार कचऱ्याचा पुनर्वापर आणि घनकचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देताना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वंचित नागरिकांना अन्न उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये वंचित नागरिकांनी सुका कचरा गोळा करून तो रिसायकल सेंटर्समध्ये द्यावयाचा असून त्या बदल्यात त्यांना सामाजिक संस्थांकडून त्या प्रमाणात मूल्य असणारे खाद्यपदार्थांचे कुपन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी २०२४-२५ महापालिका अर्थसंकल्प सादर करताना या संकल्पनेचे सूतोवाच केले आहे. सध्या यावर महापालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नोडल ऑफिसर बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखालील टीम काम करीत आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असे अनेक वंचित घटक आहेत, त्यांच्याकडे आर्थिक परिस्थितीमुळे जेवणासाठी ही पैसे नसतात. अशा घटकांनी शहरातील कचरा गोळा करून त्यातून सुका कचरा वेगळा करून तो महापालिकेने नेमलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या सेंटरमध्ये आणून द्यायचा आहे. या बदल्यात त्यांना जेवणाचे कुपन देण्यात येईल. या सेंटरमधून हा वर्गीकृत सुका कचरा महापालिकेच्या प्रक्रिया केेंद्रावर आणून त्यावर प्रक्रिया केली जाईल. यातून जो निधी मिळेल, तो त्या स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी देण्यात येईल, अशी ही संकल्पना असल्याचे स्वच्छ भारत मिशनचे नोडल ऑफिसर बाबासाहेब राजळे यांनी लोकमतला सांगितले.

महापालिका देणार स्वच्छश्री पुरस्कार
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता विषयक कामांमध्ये व उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती / संस्था यांना ‘स्वच्छश्री’ पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्यास गौरविण्याचा व या माध्यमातून इतरांमध्ये स्वच्छता कार्याविषयी प्रेरणा निर्माण करण्याचा प्रयत्न २०२४-२५ मध्ये केला जाणार आहे.

Web Title: Segregate dry waste and get food coupons, Navi Mumbai Municipal Corporation's 'Recycle and Dine' concept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.