तुर्भे एमआयडीसी येथून २.३९ किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 11:53 PM2019-12-07T23:53:50+5:302019-12-07T23:55:53+5:30
तुर्भे एमआयडीसी परिसरातून दोन किलो ३९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी परिसरातून दोन किलो ३९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. हा गांजा विक्रीसाठी एक जण त्या ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील गांजा जप्त करण्यात आला आहे.
इरफान इक्बाल खान (२५), असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो तुर्भे नाका परिसरातील राहणारा आहे. तेथील आंबेडकर नगर परिसरात एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक जी. डी. देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्चना कारखिले, संजय ठाकूर, विनायक गायकवाड आदीच्या पथकाने शुक्रवारी रात्री त्या ठिकाणी सापळा रचला होता. या वेळी इरफान हा त्या ठिकाणी आला असता, त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
या दरम्यान त्याच्याकडे दोन किलो ३९ ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा विक्री करण्यासाठी घेऊन आल्याची कबुली त्याने दिली. यानुसार त्याच्याविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. इरफान हा तुर्भे नाका परिसरातच राहणारा असून मागील अनेक महिन्यांपासून तो परिसरात गांजाची विक्री करत होता. या प्रकरणी त्याच्याविरोधात अनेकांकडून तक्रारीही प्राप्त होत होत्या. त्याच्या टोळीत इतरही अनेकांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.