नवी मुंबईतील कोल्ड स्टोरेजमधून २४ हजार किलो गोमांस सील, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:43 AM2018-02-07T06:43:31+5:302018-02-07T06:44:34+5:30
म्हशीचे मांस असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून गोमांस साठवल्या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या ठिकाणी साठवलेल्या सुमारे ७० हजार किलो मांसापैकी २४ हजार किलो गोमांस असल्याचे तपासात उघड झाले आहे.
नवी मुंबई : म्हशीचे मांस असल्याची बनावट कागदपत्रे तयार करून गोमांस साठवल्या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्या ठिकाणी साठवलेल्या सुमारे ७० हजार किलो मांसापैकी २४ हजार किलो गोमांस असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी कोल्ड अॅग्रो फ्रेश कोल्ड स्टोरेजच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक करण्याचा परवाना असलेल्या मालाऐवजी गोमांस साठवले जात असल्याचे उघड झाले आहे. विश्व हिंदू परिषदेचे सुरेश गायकवाड यांनी पावणेतील अॅग्रो फ्रेश कोल्ड स्टोरेजमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस असल्याची तक्रार २८ जानेवारीला पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलिसांनी पालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांच्या उपस्थितीत तिथे धाड टाकली होती.
या वेळी कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये कोल्ड स्टोरेजमध्ये सुमारे ७० हजार किलो वजनाचे ५० लाखांहून अधिक किमतीचे म्हशीचे मांस तिथे असल्याचे समोर आले. तशी कागदपत्रेही कोल्ड स्टोरेजचे मॅनेजर उस्मान काडीवाल व सुपरवायझर महमद शाह यांनी सादर केली होती; परंतु हे मांस गाईचे असल्याच्या संशयावरुन प्रत्येक बॉक्समधील मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला असता, तीन पैकी एक नमुना गाईच्या मांसाचा असल्याचे सिध्द झाले. त्यानुसार २४ हजार ६० किलो मांस गाईचे असल्याचे उघड झाले आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत २२ लाख ८७ हजार रुपये आहे. म्हशीच्या मांसाचे लेबल लावून हे गोमांस अॅग्रो फ्रेश कोल्ड स्टोरेजमध्ये साठवण्यात आले होते. या प्रकरणी कोल्ड स्टोरेजचे संचालक हेमंत कुमार विरोधात शासनाची फसवणूक, तसेच महाराष्टÑ प्राणी रक्षण कायद्यानुसार तुर्भे एमआयडीसी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.