नवी मुंबई : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही नवी मुंबईत काही परिसरात मोठ्या प्रमाणात या पिशव्या सर्रास वापरल्या जात आहेत. महापालिकेच्या घणसोली विभागाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एका तासात ७० किलो प्लास्टिकच्या साठ्यासह १० हजार रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली.
घणसोली गावातील स्वातंत्र्यसैनिक शंकरबुवा वाडी येथील साईबाबा मंदिरासमोर आणि डी मार्टसमोरील तुळसी व्होरा टॉवर अशा दोन दुकानांवर महापालिकेच्या विशेष भरारी पथकाने पाळत ठेवून सायंकाळी एकाच वेळी कारवाई केली. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार, परिमंडळ २ चे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या नेतृत्वाखाली घणसोली विभागाचे सहायक आयुक्त महेंद्रसिंग ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाचे प्रमुख धर्मेंद्र गायकवाड, संतोष शिलाम, स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, स्वच्छता निरीक्षक संजय पाटील, कविता खरात यांनी पोलीस बंदोबस्तात कारवाई केली.