- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई- विविध कारवायांमध्ये जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी जागा नसल्याने पोलिसांसह आरटीओपुढे जागेचा प्रश्न उभा राहिला आहे. सद्य:स्थितीला अशी वाहने पोलीस ठाण्याभोवती अथवा रस्त्यालगत ठेवली जात आहेत. परंतु कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण करून ताबा घेतला जात नसल्याने वर्षानुवर्षे पडून राहिलेली बहुतांश वाहने भंगार बनली असून पोलिसांना त्याची राखण करावी लागत आहे.अपघातग्रस्त अथवा गुन्ह्यात वापरलेली किंवा बेवारस स्थितीमध्ये उभी असलेली वाहने आरटीओ, वाहतूक तसेच शहर पोलिसांकडून जप्त केली जातात. अशा वाहनांमध्ये ट्रक, कार यांसह दुचाकी व रिक्षांचा सर्वाधिक समावेश आहे. ही वाहने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांकडून संबंधितांच्या ताब्यात दिली जातात. अथवा न्यायालयाच्या निदेशानुसार त्यांचा लिलाव केला जातो. परंतु अनेकदा जप्तीची वाहने सोडविण्याचा प्रयत्नदेखील संबंधितांकडून होत नाही. अशी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे पडून राहतात. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात जप्तीच्या वाहनांचा खच पाहायला मिळत आहे. तर आरटीओकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा ढीग एपीएमसीतल्या चाचणी मैदानाच्या एका भागात साचला आहे. ज्या पोलीस ठाण्याभोेवती जराही जागा शिल्लक नाही, पर्यायाने अशी वाहने रस्त्यालगत अथवा परिसरातल्या मोकळ्या भूखंडावर साठवली जातात. शहरात अशी शेकडो वाहने उघड्यावर धूळ खात पडून राहिल्याने झीज होऊन भंगार झाली आहेत. त्यानंतरही केवळ कायदेशीर प्रक्रियेअभावी पोलिसांना या भंगाराचीदेखील राखण करावी लागत आहे.जप्तीची वाहने साठवण्यासाठी आरटीओसह पोलिसांकडे पुरेशी जागा नाही. यामुळे त्यांना केवळ जप्तीची वाहने साठवण्यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता भासत आहे. कायदेशीर प्रक्रियेपूर्वी जप्तीतले वाहन गहाळ झाल्यास संबंधित अधिकाºयाला न्यायालयाची चपराक बसू शकते. यामुळे भंगार झाले तरीही पोलिसांकडून त्याची जपवणूक होत आहे. मुळात ठरावीक कालावधीनंतरही जप्तीच्या वाहनांचा संबंधिताने ताबा घेतला नाही, तर ती सुस्थितीत असतानाच लिलावात काढणे आवश्यक आहे. असे झाले तरच त्यापासून शासनाला पुरेसा मोबदला मिळू शकतो. परंतु वर्षानुवर्षे ती पडून राहिल्यानंतर त्यांचा भगार म्हणून कवडीमोल भावाने लिलाव केला जातो. कायद्याच्या प्रक्रियेतील अशा दिरंगाईमुळे शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या आवारात भंगाराचे ढीग साचले आहेत. याचा परिणाम परिसराच्या स्वच्छतेवरदेखील होत आहे.>रिक्षांची संख्या अधिकआरटीओकडून जप्त केल्या जाणाºया वाहनांमध्ये रिक्षांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. ठरावीक कालावधीनंतर अशा रिक्षांचादेखील लिलाव केला जातो. अशावेळी एका शहरात खरेदी केलेल्या भंगार रिक्षांची डागडुजी करून दुसºया शहरात वापरल्या जातात. शहरात रस्त्यावर धावणाºया बोगस रिक्षांमध्येअशाच भंगार रिक्षांचा समावेश आहे.
जप्त केलेली वाहने ठरताहेत डोकेदुखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:50 AM