कर्नाटक हापूसची कोकणच्या नावाने विक्री, विक्रेत्यांची बनवाबनवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:46 AM2018-04-06T06:46:00+5:302018-04-06T06:46:00+5:30
मुंबई, नवी मुंबईमध्ये कोकणातील हापूसच्या नावाने कर्नाटकच्या हापूसची विक्री सुरू झाली आहे. जादा नफा मिळविण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांची फसवणूक केली आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - मुंबई, नवी मुंबईमध्ये कोकणातील हापूसच्या नावाने कर्नाटकच्या हापूसची विक्री सुरू झाली आहे. जादा नफा मिळविण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांची फसवणूक केली आहे. फसवणूक टाळण्यासाठी नियमित विक्रेत्यांकडूनच आंबा विकत घेण्याचे आवाहनही व्यापाऱ्यांनी केले आहे.
फळांच्या राजाचा हंगाम सुरू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून २१६ ट्रक, टेंपोमधून तब्बल ५१,४४७ पेट्यांची आवक झाली आहे. कोकणचा हापूस एपीएमसीच्या होलसेल मार्केटमध्ये २०० ते ८०० रुपये डझन दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ४०० ते १२०० रुपये आहेत. मार्केटमध्ये कर्नाटकमधूनही ४७ वाहनांमधून १०,३८० ट्रक, टेंपोची आवक झाली आहे. कर्नाटकचा हापूस होलसेल मार्केटमध्ये ९० ते १४० रुपये किलो दराने विकला जात आहे. मार्केटमध्ये कोकण व कर्नाटक दोन्ही ठिकाणावरून हापूसची आवक होत आहे. कोकणच्या हापूसला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असून त्याचा दर्जाही चांगला आहे. कर्नाटकच्या हापूस स्वस्त असला तरी त्याला मागणीही कमी आहे. यामुळे परप्रांतीय फेरीवाले व घरोघरी डोक्यावर पेटी घेऊन विक्री करणारे कर्नाटकचा हापूस कोकणच्या नावाने विकून ग्राहकांची फसवणूक करत आहेत.
आंबाविक्रेते कर्नाटकच्या आंब्यालाही देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये पॅकिंग करत आहेत. कोकणचा हापूस असेल तरच ग्राहक आंबा खरेदी करत असल्याने विक्रेत्यांनी बनवाबनवी सुरू केली आहे. ग्राहकही स्वस्तामध्ये कोकणचा हापूस मिळत असल्यामुळे फेरीवाल्यांकडून माल खरेदी करत आहेत. ग्राहकांची फसवणूक सुरू असून कोकणच्या हापूसच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयांनी ग्राहकांनी नियमित फळांचा व्यापार करणाºया विक्रेत्यांकडूनच आंबा खरेदी करावा. डोक्यावर बॉक्स घेऊन विक्री करणाºयांकडून शक्यतो आंबा खरेदी करू नये. खरेदी केल्यास तो कोकणचाच आहे का? याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
मुंबई बाजार समितीमध्ये कोकणातून व कर्नाटकमधून हापूसची आवक सुरू झाली आहे. काही विक्रेते कर्नाटकचा हापूस कोकणच्या नावाने विकून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. ग्राहकांनी नियमित विक्रेत्यांकडूनच खरेदी करून फसवणूक टाळावी.
- संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसी
कर्नाटकमधून 10,380 पेट्यांची आवक
दक्षिणेतील राज्यांमधूनही मुंबईमध्ये आंब्याची आवक होत असते. सद्य:स्थितीमध्ये कर्नाटकमधून सरासरी १० हजार पेट्यांची आवक होत आहे. गुरुवारी १०,३८० पेट्यांची आवक झाली. होलसेल मार्केटमध्ये ९० ते १४० रुपये किलो दराने हापूसची विक्री होत असून, किरकोळमध्ये कोकणच्या नावाने जादा दराने हा आंबा विकून ग्राहकांची फसवणूक सुरू आहे.
कोकणातून 51,447 पेट्यांची आवक
बाजार समितीमध्ये रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. सद्य:स्थितीमध्ये रोज सरासरी ५० हजार पेट्यांची आवक सुरू आहे. गुरुवारी ५१,४४७ पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये २०० ते ८०० दराने व किरकोळमध्ये ४०० ते १२०० रुपये दराने हापूस विकला जात आहे.
हापूसमधील फरक
वर्णन कोकण कर्नाटक
साल पातळ जाड
आकार गोल निमुळता
आतील रंग केशरी पिवळा