दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी परिसंवाद; रोजगाराबाबत मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:18 AM2019-12-11T00:18:09+5:302019-12-11T00:18:25+5:30
जागतिक अपंग दिनाच्या औचित्यावर राबवला उपक्रम
नवी मुंबई : जागतिक अपंगत्व दिनाचे औचित्य साधून ऐरोली येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. एम.बी.ए. फाउंडेशन आणि सेल्फ इस्टीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास परिसरातील दिव्यांग व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.
दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक अपंगत्वावर मात करून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळणे काळाची गरज आहे. तर त्यांच्यासाठी रोजगार, व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींचीही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. याच उद्देशाने या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते. या वेळी आयकर विभागाचे आयुक्त सतीश शर्मा, गौरी राजन, शुभांगी तिरोडकर, जे. पी. पाठारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून उपस्थित दिव्यांगांना रोजगार, व्यवसायसंबंधी आवश्यक माहिती दिली.
कार्यक्रम प्रसंगी उत्साहवर्धक प्रेरणाशक्ती म्हणून दिव्यांगकन्या अश्विनी पुराणिक यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा मीनाक्षी बालासुब्रह्मण्यन व संचालिका मीनल मंडलिक यांनी संस्थेमार्फत बालकांसह प्रौढ व्यक्तींकरिता राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
परिसंवादाच्या पहिल्या सत्रात प्रशिक्षण, सशक्तीकरण आणि सामाजिक दृष्टिकोन व उपलब्ध संधी या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये अनिता अय्यर, नितीन पोद्दार, स्वप्निल देवलवार, जी. एस. कृष्णन यांनी अनुभव कथन केले. तर अंतिम सत्रात दिव्यांगत्वावर मात करून विविध क्षेत्रात ठसा उमटवणाºया यशस्वी महिलांनी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. संध्या लिमये, डॉ. केतन मेहता, सिद्धी देसाई, कनीषा भुर्के, चंदा जागडे आदीनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर गीता कॅस्टेलिनो यांनी सूत्रसंचलन केले.