नवी मुंबई : ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी दिलेला ९५ लाख रूपयांचा निधी परत पाठविल्याबद्दल शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात प्रशासनास धारेवर धरले. बाह्य यंत्रणेद्वारे सीटी स्कॅन व डायलिसिस सुविधा उलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावरही आक्षेप घेतल्याने अखेर दोन्ही प्रस्ताव मागे घेवून आरोग्य समितीकडे पाठविण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे सीटी स्कॅन यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या सुविधेसाठी वर्षाला ६४ लाख ५६ हजार व पाच वर्षामध्ये ३ कोटी २२ लाख रूपये खर्च करण्यात येणार होते. ऐरोली व वाशी सार्वजनिक रूग्णालयामध्ये डायलिसिसचे उपचारही बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी वर्षाला १ कोटी ७३ लाख व पाच वर्षाला ८ कोटी ६५ लाख रूपयांची तरतूद असल्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला होेता. विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी या प्रस्तावावरून प्रशासनाला धारेवर धरले. खासदार राजन विचारे यांनी ९५ लाख रूपयांचा खासदार निधी दिला पण त्याचा उपयोग करण्यात आला नाही. परिणामी हा निधी जिल्हा नियोजन समितीला परत द्यावा लागला. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे ही वेळ आल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायची का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नगरसेवक एम. के. मढवी यांच्यासह इतर सदस्यांनीही आरोग्य विभागाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे दोन्हीही प्रस्ताव मागे घेवून ते आरोग्य समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
आरोग्य विभागाच्या कारभारावर सेनेची टीका
By admin | Published: April 19, 2017 12:50 AM