महागाई विरोधात सेनेचा मोर्चा, नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 03:47 AM2017-09-29T03:47:49+5:302017-09-29T03:47:52+5:30
वाढत्या महागाई विरोधात भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी मोर्चा काढत शहरात निषेध रॅली काढली.
पनवेल : वाढत्या महागाई विरोधात भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी मोर्चा काढत शहरात निषेध रॅली काढली. या मोर्चाला सेनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता.
सध्याच्या घडीला महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल- डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत, गॅस सिलिंडर, डाळ तसेच रोजच्या वापरातील जीवनाश्यक वस्तूचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. मोदी सरकार महागाई आटोक्यात आणण्यात अयशस्वी ठरत असल्याने केंद्रात व राज्यात भाजपासोबत सत्तेत असलेल्या सेनेनेच भाजपाविरोधात मोर्चा काढला आहे. मुंबईत या मोर्चाना सुरुवात झाली होती. या वेळी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. काँग्रेसच्या काळात २०१३मध्ये गॅस सिलिंडरची किंमत ३५० आणि मोदी सरकारच्या काळात गॅस सिलिंडरची किंमत ७०० अशा प्रकारचे फलक झळकविण्यात येत होते. जिल्हाप्रमुख आ. मनोहर भोईर यांनी वाढत्या महागाईविरोधात सर्वसामान्यांना मोठी नाराजी असल्याचे सांगितले. जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, रामदास पाटील, परेश पाटील, गुरु नाथ पाटील, रामचंद्र देवरे, आत्माराम गावंड, अरविंद कडव, प्रथमेश सोमण आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.