हरित क्रांतीसाठी सीबीडीमध्ये ज्येष्ठांचा पुढाकार
By admin | Published: June 8, 2015 04:12 AM2015-06-08T04:12:12+5:302015-06-08T04:12:12+5:30
झोपडपट्टी परिसरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील पडीक जागेत हरित क्रांती घडविण्याचा अनोखा प्रयोग सीबीडी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.
प्राची सोनवणे, नवी मुंबई
पर्यावरणाच्या ऱ्हासांमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न भेडसावत आहे. सिमेंटच्या जंगलात हिरवळ लोप पावत आहे. अशा परिस्थितीत दुर्लक्षित म्हणून गणल्या गेलेल्या झोपडपट्टी परिसरातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील पडीक जागेत हरित क्रांती घडविण्याचा अनोखा प्रयोग सीबीडी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे. या ज्येष्ठांनी या जागेवर हिरव्या पालेभाज्यांची, फळझाडांची लागवड करून परिसर हिरवागार केला आहे. इतकेच नव्हे, तर या ठिकाणी बटरफ्लाय पार्क विकसित करून तेथे फुलपाखरांच्या १५0 हून अधिक प्रजातींचे संवर्धन केले आहे.
या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने हरित विकासाचा उपक्रम राबविला. त्यांच्यातला उत्साह आणि निसर्ग संवर्धनाचा ध्यास पाहून अनेक तरुण-तरुणी, इतर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले यामध्ये सहभागी झाली आहेत. पालक, लाल माठ, चवळी, दुधी, भेंडी, वांगे, शेंगा, दोडके, गवार, कारले, भोपळा अशा भाज्या तसेच केळी, पपई, चिकू, सीताफळ, पेरु, आंबा अशा फळझाडांची लागवड केली आहे. फुलपाखरांच्या दुर्मीळ प्रजातींचे रक्षण करण्यासाठी बटरफ्लाय पार्क उभारले आहे. यामध्ये बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून अनेक दुर्मीळ जातीच्या फुलपाखरांचे संवर्धन केले जाते त्याचबरोबर चिमण्या, परदेशी पक्षीही या पार्कला भेट देतात. असंख्य पक्ष्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून आपले हक्काचे घर मिळाले आहे. या सर्व परिसराची देखरेख इथले स्थानिक नागरिक करतात. पाण्याचे संवर्धन आणि वीज बचत यांसारखे उपक्रमही येथे राबविले जातात. वसंत ऋतू, पावसाळ््याच्या सुरुवातीला याठिकाणी झाडांची लागवड करण्यात येते.
रेसिडेन्सी अॅग्रो सोसायटी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी पर्यावरणपूरक उपक्रम येथे राबविले जातात. वसंत उत्सव, कचरा व्यवस्थापन कार्यशाळा, आरोग्याला उपयुक्त ठरणारी पाककला, शाळकरी मुलांना पर्यावरणाची ओळख असे उपक्रम राबविले जातात. कॅप्टन पांडे, एन. एस. पितळे, बी. व्ही. रंगनाथन, खोपकर, राजीव गोविंदन, मारीयो, प्राची मर्चंट या सदस्यांच्या देखरेखीखाली हा अॅग्रो सोसायटीचा उपक्रम सुरु आहे.
शेतातली भाजी थेट ग्राहकांच्या दारी
नागरिकांना फार्म फ्रेश हिरव्या पालेभाज्यांचा आस्वाद घेता येतो. भाजी मंडईत जाऊन भाजी खरेदी करण्यापेक्षा शेतातल्या ताज्या भाज्या खरेदी करता येत असल्याने नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. रोज संध्याकाळी या ठिकाणी अल्प दरात ताज्या भाज्यांची विक्री केली जाते. यातून मिळणाऱ्या पैशांमधूनच बी-बियाणे, खते, सिंचनाच्या सुविधा, फवारणी यासारखे काम केले जाते.
पक्ष्यांना मिळाले हक्काचे घर
बॉटनिकल गार्डनमुळे या रोपवाटिकेत अनेक पक्षी आणि फुलपाखरे येतात. यामध्ये दुर्मीळ प्रजाती पहायला मिळतात. यामुळे फुलपाखरांना आणि पक्ष्यांना घर मिळाले आहे आणि त्यांचे संवर्धनाच्या दृष्टीने तशा झाडांचीही या ठिकाणी लागवड केली आहे. पर्यावरण संवर्धनातून निसर्गाशी जवळीकता साधण्याचा हा उपक्रम आहे. वृक्ष लागवडीने परिसरात होणारी मातीची धूप थांबली आहे.
- कॅप्टन पांडे, सदस्य
तरुणांनी सहभागी व्हावे
शहरात हरित पट्टा वाढविण्यासाठी तरुणांनी सहभागी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. वातावरण शुध्द रहाण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे ती जगविली पाहिजे. गेली १५ वर्षे आम्ही हा उपक्रम राबवित आहोत. याच परिसरात ज्येष्ठांसाठी नाना - नानी पार्क आणि लहान मुलांसाठी खेळाचे मैदान उभारले आहे. - एन. एस. पितळे, सदस्य