- नामदेव मोरे नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोनामुळे ५००पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधील ६८ टक्के नागरिक ५०पेक्षा जास्त वयोगटांतील आहेत. ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात अडकत असून, शरीर उपचारास साथ देत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये व शासनयंत्रणेनेही त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात २० जुलैला कोरोनामुळे ५०५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी तीन टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटांतील नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, मधुमेह व इतर गंभीर आजार असतात. या आजारांमुळे कोरोना लवकर होत आहे.
अनेकदा इतर गंभीर आजारांमुळे शरीर उपचारास साथ देत नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १० वर्षे वयोगटांतील एक जणाचा मृत्यू झाला आहे. ११ ते २० वयोगटांतील ७, एकवीस ते तीस वयोगटांतील २२, एकतीस ते ४० वयोगटांतील ३९, एकेचाळीस ते पन्नास वयोगटांतील ८८, एकावन्न ते साठ वयोगटांतील १५१, एकाहत्तर ते ऐंशी वयोगटांतील ५२ व ८०पेक्षा जास्त वय असलेल्या १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ज्येष्ठांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघटना, महानगरपालिका व पोलिसांनी केले आहे. परिवारातील व समाजातील सर्वांनी ज्येष्ठांना सहकार्य करणे आवश्यक आहे. एकटे किंवा दोघे ज्येष्ठ नागरिक एखाद्या घरात वास्तव्य करत असतील, तर त्यांना जीवनावश्यक वस्तू घरपोच उपलब्ध व्हाव्यात. औषधे आणून देणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जायचे ज्येष्ठांनी टाळले पाहिजे. व्यायामासाठी घराबाहेर पडण्यापेक्षा घरातच योगासने करावी. योग्य खबरदारी घेतली, तर कोरोनामुळे होणारे ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यू थांबविणे शक्य होणार आहे.
शक्यतो घराबाहेर पडू नये
च्ज्येष्ठ नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी केले आहे. ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेनेही ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन केले आहे. च्मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने ५० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यापाऱ्यांनी शक्यतो मार्केटमध्ये येऊ नये, आवाहन केले आहे. च्त्याच धर्तीवर इतर व्यवसायातील ज्येष्ठ नागरिकांनी महत्त्वाचे काम नसेल, तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन महानगरपालिका व पोलिसांनीही करणे आवश्यक आहे. ज्येष्ठांनी स्वत:ही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:ची योग्य काळजी घ्यावी. शक्यतो, घराबाहेर पडू नये. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. खबरदारी हाच सुरक्षिततेचा योग्य मार्ग आहे. योग्य खबरदारी घेऊन कोरोनाला दूर ठेवले पाहिजे.- डॉ.एस.पी. किंजवडेकर, संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ
ज्येष्ठ नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन आम्ही केले आहे. एकटे किंवा दोघे राहणाºया ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांची हेल्पलाइन आहे. हेल्पलाइनवर संपर्क केला की, धान्य, औषध आणून दिले जाते. कोरोना तपासणी व उपचार तत्काळ मिळावे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी महानगरपालिकेची हेल्पलाइन किंवा विशेष सेल असावा.- अण्णासाहेब टेकाळे, उपाध्यक्ष, अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ