शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यात सेनेला अपयश
By admin | Published: January 24, 2017 06:04 AM2017-01-24T06:04:43+5:302017-01-24T06:04:43+5:30
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जतन करण्यात नवी मुंबईतील शिवसेना नेत्यांना अपयश आले आहे.
नवी मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जतन करण्यात नवी मुंबईतील शिवसेना नेत्यांना अपयश आले आहे. निधनानंतर चार वर्षानंतरही एकही महत्वाच्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नसल्याने सामान्य शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करण्यात सुरुवात केली आहे.
नवी मुंबईच्या उभारणीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेला सत्ता मिळाली व संजीव नाईक हे देशातील सर्वात कमी वयाचे महापौर झाले. यानंतर शहराच्या विकासकामांवर बाळासाहेबांनी स्वत: लक्ष दिले होते. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची रचना करण्यामध्ये त्यांनी स्वत: लक्ष दिले होते. वाशीतील प्रथम संदर्भ रूग्णालयाचा भुखंड मिळविण्यापासून ते रूग्णालय उभारण्यापर्यंत बाळासाहेबांचे योगदान होते. शहरातील एकमेव सांस्कृतिक केंद्र असलेले विष्णुदास भावे नाट्यगृह सिडकोकडून हस्तांतरण करून घेतले होते. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची सुरवातही बाळासाहेबांच्या जन्मदिनाच्या दिवशीच झाली होती.
माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यापासून बहुतांश प्रमुख नेत्यांची सुरवात शिवसेनेमधूनच झाली होती. राष्ट्रवादी काँगे्रसमधील अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आताही आम्ही मुळचे शिवसेनेचे असल्यचे अभिमानाने सांगतात. बाळासाहेबांविषयी सर्वांनाच आदर आहे पण त्यांच्या निधनानंतर चार वर्ष झाल्यानंतरही अद्याप त्यांचे स्मारक शहरात उभे राहिलेले नाही. एकही उद्यान, शाळा, रूग्णालय व इतर महत्त्वाच्या प्रकल्पांना त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. जयंती व पुण्यतिथीला होर्डींग व सोशल मिडीयामधून आदर व्यक्त करणारे नेते प्रत्यक्षात त्यांच्या स्मृती जतन करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरातील निष्ठावान शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या निधनानंतर महासभेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना महापौरांसह सर्व पक्षीय नगरसेवकांनी साहेबांचे स्मारक उभे राहिले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले होते. पण प्रत्यक्षात त्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी घणसोलीमधील प्रस्तावीत क्रीडांगणाला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केली आहे. पण ते क्रीडांगण उभे राहण्यास आवकाश आहे.
राज्य शासनाने एसटी डेपोच्या भुखंडावर त्यांच्या नावाने अभियांत्रीकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा एक वर्षापुर्वी केली आहे. पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. (प्रतिनिधी)