दिव्यांगांसाठी संवेदना उद्यान; राज्यातील पहिला उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 01:33 AM2020-01-01T01:33:37+5:302020-01-01T01:33:44+5:30
शहरात विशेष उद्यानाची भर
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : उद्यानांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी संवेदना उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. स्पर्शज्ञान, सुगंध, जाणीव, ध्वनी, चव या मानवाच्या पंचेंद्रियांवर आधारित संकल्पनेवर संवेदना उद्यान विकसित करण्यात आले असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.
नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून उद्याने, मोकळ्या जागा, ट्री बेल्ट, रस्ता दुभाजक अशी सुमारे २४५ ठिकाणी हिरवळ विकसित करण्यात आली आहे. उद्यानांमध्ये जॉगिंग ट्रॅक, आकर्षक खेळणी, बैठक, विद्युत व्यवस्था, हिरवळ, विविध झाडे-झुडपे, ओपन जीम आदी अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. महापालिकेने निर्माण केलेल्या सुविधांचे नागरिकांनी देखील स्वागत केले आहे.
सानपाडा सेक्टर १० येथे महापालिकेने संवदना उद्यानाची निर्मिती केली असून तीन भागात विभागलेल्या उद्यानात पहिल्या भागात दिव्यांग व्यक्तींना साजेशी अशी खेळणी, साधने, वृक्ष, सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये व्हीलचेअरच झोपाळा, वाळूचा हौद, बोगदा, लेस बांधण्यासाठी बूट वेगवेगळ्या प्रकारची हिरवळ, दगड, लाकूड, लादी, गोटे बसविलेला मार्ग, सापशिडीचा खेळ, स्पिकिंग ट्यूूब, बेल ट्री, फुली गोळ्याचा खेळ इत्यादी सुविधांचा समावेश असून सदर भागात विविध झाडे झुडपे लावण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा व लहान मुलांसाठी विविध खेळणी बसविण्यात आली आहेत. उद्यानाच्या मधल्या भागात पूर्णपणे हिरवळ तयार करण्यात आली आहे त्याच्यात तीन छोटे पाण्याचे हौद तयार केले असून त्यामध्ये कमळासारखी तरंगती वनस्पती लावण्यात आली आहेत.
तिसऱ्या टप्प्यात नागरिकांना योग साधना करण्यासाठी सुमारे १८० चौरस मीटर क्षेत्रफळाचा मंडप, सेल्फी फ्रेम, हनिकोंब स्ट्रक्चर, छोटे कारंजे, बुद्धिबळ चौकटी करण्यात आली आहे. उद्यानाच्या सभोवताली ५१२ मीटर लांबीचा सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला असून विशेष सुविधेसह दोन स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आली आहेत.