नवी मुंबई : तीन वर्षांपूर्वी कोपरखैरणेत घडलेल्या पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा लागली आहे. त्याने सहा वर्षांच्या मुलीला उंदीर मारण्याचे औषध मिसळलेला भुर्जीपाव खायला घालून बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अतिप्रसंग केला होता; परंतु या दुर्घटनेमध्ये वाचल्यानंतरही दुर्दैवाने तीन महिन्यांपूर्वी साप चावल्याने तिचा मृत्यू झाला.आफाजउद्दीन जमीर उल शेख (५६) असे शिक्षा लागलेल्या आरोपीचे नाव आहे. तो कोपरखैरणे सेक्टर १९ मधील राहणारा असून, त्याच परिसरातील पीडिता (९) हिच्यावर तीन वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. त्याने भुर्जीपावमध्ये उंदीर मारण्याचे औषध मिसळून पीडितेला खायला देऊन बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अतिप्रसंग केला होता. यानंतर त्याने तिला एकांताच्या ठिकाणी सोडून पळ काढला होता. दरम्यान, पीडिता बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने रुग्णालयात दाखल केले असता, तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे समोर आले. उपचारादरम्यान ती चार दिवस बेशुद्ध असतानाही पोलिसांनी शिताफीने अवघ्या १२ तासांतच आरोपी आफाजउद्दीनला अटक केलेली. परिसरातील व्यक्तींच्या चौकशीदरम्यान गुन्ह्याचे तपास अधिकारी तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांना त्याच्यावर संशय आला होता. यामुळे चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती; परंतु उंदीर मारण्याचे विषारी औषध खाल्याने पीडितेची प्रकृती गंभीर होती.या वेळी पोलिसांनी उपचारखर्च करून तिला जीवदान दिले होते. दुर्दैवाने न्यायालयात खटला सुरू असतानाच तीन महिन्यांपूर्वी तिचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. मात्र, मृत्यूपूर्वीच काही दिवस अगोदरच न्यायालयात तिची साक्ष झालेली होती. त्याशिवाय पोलिसांनीही दहा साक्षीदार व सबळ पुराव्याआधारे न्यायालयात दोषारोपपत्र सादर करून आरोपी निर्दोष सुटणार नाही याची खबरदारी घेतली होती. त्याआधारे पीडित मुलीच्या वतीने महिला सरकारी वकील रेखा हिवराळे या न्यायालयात युक्तिवाद करत होत्या. त्यांनी घटनेचे गांभीर्य न्यायालयापुढे मांडून आरोपीवर सक्त कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या अंतिम सुनावणीदरम्यान सबळ पुराव्याआधारे न्यायाधीश संगीता खलिफे यांनी आफाजउद्दीन याला जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रोडेकर व पोलीस शिपाई रमेश बिरारी यांनी पुरावे जमा करण्यासह साक्षीदारांना आत्मविश्वास देण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत मयत पीडितेच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे; परंतु एकदा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्यानंतर खटल्याच्या निकालापूर्वीच सर्पदंशाने तिचा मृत्यू झाल्याचे दु:ख पीडितेच्या आईने व्यक्त केले आहे.
पोक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप, ५० हजार रुपये दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 3:46 AM