कर्नाळ्यात अपघातांची मालिका, एका महिन्यात दहा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 02:45 AM2019-06-28T02:45:41+5:302019-06-28T02:45:55+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत अपघातांची मालिका सुरू आहे. येथील वळणावर ट्रेलर व इतर अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना घडत आहेत.
पनवेल - मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत अपघातांची मालिका सुरू आहे. येथील वळणावर ट्रेलर व इतर अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. एका महिन्यात दहा अपघात झाले असून दोघांना जीव गमवावा लागला असून १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महामार्गावर होणाऱ्या अपघाताविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. गुरु वारी देखील या मार्गावर ट्रेलर उलटला. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. खिंडीतील कमळतळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागमोडी वळण देण्यात आले आहे. याठिकाणाहून जाताना वाहन चालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कर्नाळा खिंडीत अवजड वाहनांचेच अपघात होत आहेत. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.
२०१८ मध्ये या संपूर्ण मार्गावर सुमारे १५६ अपघातांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातात ४० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये देखील अपघातांचा आकडा वाढतच चालला आहे. यामध्ये कर्नाळा खिंडीत होणाºया अपघातांची संख्या लक्षणीय आहे. कर्नाळा खिंडीत रस्त्याचे रुंदीकरण करताना वृक्षांची मोठी कत्तल करण्यात आली. त्यानंतर मोठी नागमोडी वळणे देऊन हा रस्ता तयार करण्यात आला. विशेष म्हणजे अतिवेगाने याठिकाणाहून वाहने जात असतात. वळणाचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघाताचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी नागमोडी वळण देताना वळण कमी करण्याची गरज होती.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्याप सुरू आहे. ते पूर्ण झालेले नाही. शासनाने दिलेली १६ जून २०१९ ची डेडलाइन देखील पुढे गेली असल्याने महामार्गाचे काम पूर्ण कधी होणार? असा प्रश्न सध्याच्या घडीला विचारला जात आहे. रुंदीकरण करताना या रोडवरील अपघात कमी करण्यासाठीही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
ग्रामस्थांचीही होत आहे गैरसोय
महामार्गाच्या दोन्ही बाजूला गावे आहेत. या गावांसाठी सर्व्हिस रोड, भुयारी मार्ग व इतर प्रस्तावित आहे. गावांमधील नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी योग्य सुविधा नाही. यामुळे रोडवरूनच रस्ता ओलांडावा लागत असून त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
कर्नाळा खिंडीत नागमोडी वळण असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवून संबंधित नागमोडी वळण कमी करण्याची विनंती केली आहे.
- अशोक नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
नवीन पनवेल वाहतूक शाखा