नामदेव मोरे नवी मुंबई : महापालिका व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ठाणे-बेलापूर रोडवर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. तुर्भे ते दिघा दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. अपघातजन्य ठिकाणांची माहितीही देण्यात आलेली नाही. यामुळे रोज अपघात होवू लागले असून, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होवू लागली आहे.ठाणे-बेलापूर रोडवरून ऐरोलीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील (डीएन ०९ एन ९४५०) चालकाला घणसोलीजवळील उड्डाणपुलाचा अंदाज आला नाही. पुढे उड्डाणपूल असल्याच्या सूचनाही रोडवर कुठेच लावण्यात आल्या नव्हत्या. यामुळे कंटेनरने दुभाजकास धडक दिली. कंटेनर दुभाजकावरून १०० फूट पुढे गेला. या अपघातामध्ये चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. कंटेनर पलटी झाला नसल्याने वाहतूककोंडी व जीवितहानी झाली नाही. घणसोली रेल्वे स्टेशनसमोरील हा पहिला अपघात नाही. एक महिन्यात तीन कंटेनरचे याच ठिकाणी अपघात झाले आहेत. एक कंटेनरच्या धडकेमुळे रोडला लागून असलेली संरक्षण भिंतही कोसळली आहे. अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीही झाली होती. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी रंबलर्स बसविण्यात यावेत. १०० व २०० मीटर अंतरावर पुढे उड्डाणपूल असल्याचे सूचना फलक लावणे आवश्यक आहे. शिवाय एमएमआरडीएच्या भुयारी मार्गाचे काम सुरू असून त्याचा उल्लेखही असणे आवश्यक आहे. पण यापैकी काहीही सूचना नसल्यामुळे हा अपघात झाला. याठिकाणी रोज किमान एकतरी वाहनाचा अपघात होत आहे. पूर्ण ठाणे-बेलापूर रोडवर हीच स्थिती आहे. तुर्भे नाक्यावर या रोडची सुरुवात होते. महामार्ग संपल्यानंतर पुढे एपीएमसीच्या दिशेला जाण्यासाठी उड्डाणपूल आहे. वास्तविक ठाण्याकडे जाणारी वाहने पुलावरून न जाता डावीकडून पुढे जाणे अपेक्षित आहे. पण याविषयी सूचना फलक देण्यात आलेला नाही. यामुळे अनेक वाहने दुभाजकाला धडकत आहेत.तुर्भे स्टोअर्सवरून पुढे आल्यानंतर कोपरीकडे जाणारा उड्डाणपूल आहे. वाशी, एपीएमसीकडे जाणारी वाहने या पुलावरून जाणे अपेक्षित आहे. ठाण्याकडे जाणाºया वाहनांसाठी हा पूल नाही. पण याविषयी योग्य सूचना फलक योग्य अंतरावर लावण्यात आलेले नाहीत. यामुळे ठाणे-बेलापूर रोडवर उड्डाणपुलांच्या सुरुवातीला अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.>कोट्यवधी रुपये पाण्यातमहापालिकेने ठाणे-बेलापूर रोडच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका दिला आहे. ठेकेदाराने वर्षभर रोडवर दुभाजकाजवळ परावर्तक पट्ट्या बसविणे, दुभाजकाची स्वच्छता ठेवून त्यांची रंगरंगोटी करणे, रोडवर आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक बसविणे आवश्यक आहे. पण ठेकेदार कामचुकारपणा करत असून पालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात जात असून अपघातामुळे जीवित व वित्तहानी होत आहे.>रंबलर्स बसवाघणसोली रेल्वे स्टेशनबाहेर उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून वारंवार अपघात होत आहे. गत महिन्यात दोन वेळा कंटेनर पलटी झाल्याने प्रचंड वाहतूककोेंडी झाली होती. बुधवारी पहाटेही याच ठिकाणी कंटेनरचा अपघात झाला आहे. पुलाच्या १०० मीटर अंतरावर सूचना फलक व रंबलर्स बसविण्यात यावेत अशा सूचना वाहतूक पोलिसांनी महापालिकेला केल्या आहेत.>ठाणे-बेलापूर रोडवर पुरेसे सूचना फलक नाहीत. अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स बसविण्यात यावेत, परावर्तक पट्टे व सूचना फलक लावण्यात यावेत यासाठी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे.- नितीन पवार,पोलीस उपआयुक्त,वाहतूक
ठाणे-बेलापूर रोडवर अपघातांची मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 2:42 AM