सराईत गुन्हेगार दुकलीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 04:35 AM2018-10-06T04:35:05+5:302018-10-06T04:35:24+5:30
कोपरी येथून रंगेहाथ पकडले : गुन्हे शाखेच्या कक्ष एकची कारवाई
नवी मुंबई : दोघा सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या कक्ष एकच्या पथकाने अटक केली आहे. ते कोपरी येथे येणार असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्यांना पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी चार गुन्ह्यांची कबुली दिली असून, सव्वा लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
मोहम्मद आरिफ मेहनदी अन्सारी (२८) व हरिश धनराज गिरी (१९) अशी त्यांची नावे आहेत. गिरी हा सानपाडा येथील तर अन्सारी हा दिवा येथील राहणारा आहे. त्यांनी नेरुळमध्ये रिक्षा तर एपीएमसी, कोपरी व वाशी रेल्वेत मोबाइल चोरीचे केलेले चार गुन्हे कबूल केले आहेत.
कोपरी गावात हे दोघे जण चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष एकच्या पथकाला मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उल्हास कदम, राहुल राख, सहायक उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, भगवान तायडे, दीपक पाटील, अनिल सूर्यवंशी व गणेश तुपे आदीचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी कोपरी परिसरात सापळा रचला असता, रिक्षातून आलेल्या संशयितांची चौकशी केली असता, अन्सारी व गिरी हे पोलिसांच्या हाती लागले. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून ते कोपरी येथेही चोरीच्या उद्देशाने आले होते. यानुसार त्यांना अटक केली असता, चौकशीत त्यांनी चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात नेरुळमधील रिक्षा चोरी, एपीएमसी येथील तीन मोबाइल चोरी, कोपरखैरणेतील एक मोबाइल चोरी तसेच वाशी रेल्वे पोलीस ठाण्यातील एक मोबाइल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानुसार या गुन्ह्यातील १ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.