- नामदेव मोरेनवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे फळ मार्केट बांगलादेशी, परप्रांतीयांसह गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाले आहे. चोर, दरोडेखोरांसह गांजा व गुटखाविक्रेत्यांनाही वास्तव्यासाठी मार्केट खुले करून देण्यात आले आहे. घुसखोरांवर कारवाई करण्यापेक्षा प्रशासनाने त्यांच्यावर सुविधांचा वर्षाव सुरू केला आहे.देशातील सर्वात बकाल मार्केट अशी फळ बाजाराची सर्वत्र बदनामी होऊ लागली आहे. मार्केटमध्ये पहाटे ४ ते ५ वाजल्यापासून देशाच्या विविध भागांतून फळांची आवक सुरू होते. सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत फळ मार्केटमधील व्यवहार सुरू असतात. नियमाप्रमाणे रात्री ८ नंतर मार्केटमधील सर्व गेट बंद करणे आवश्यक आहे; परंतु मार्केटचे दरवाजे परप्रांतीय घुसखोरांना २४ तास खुले करून देण्यात आले असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये लक्षात आले आहे. पश्चिम बंगार, बिहार व उत्तरप्रदेशमधून आलेले दीड हजारांपेक्षा जास्त कामगार मार्केटमध्ये मुक्कामासाठी थांबलेले निदर्शनास आले. यामध्ये अनेक जण बाहेर काम करून रात्री मुक्कामासाठी येथे आले असल्याचे निदर्शनास आले. एकही कामगाराची नोंद बाजार समितीच्या कार्यालयामध्ये नाही. ज्या गाळ्यांमध्ये कामगार झोपत आहेत, त्यांच्याकडेही त्यांची नोंद नाही. एपीएमसी पोलीस स्टेशनकडेही मार्केटमध्ये मुक्काम करणाऱ्यांची काहीही माहिती उपलब्ध नाही. काही व्यापाºयांनी महिन्याला १० ते १५ हजार रुपये भाडे आकारून कामगारांना आश्रय दिला असल्याचेही निदर्शनास आले. कामगारांना गुटखा, तंबाखू, दारू, गांजाही उपलब्ध करून दिला जात आहे. मार्केटला पूर्णपणे धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.रात्री ८ ते १२ दरम्यान मार्केटला खाऊगल्लीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. परप्रांतीय कामगारांसाठी बिर्याणी, चायनीस, मटण उपलब्ध करून दिले जात आहे. मांसाहारी पदार्थ बनविण्याचा व मार्केटमध्ये मटण घेऊन येण्याचा परवाना कोणाकडेही नाही. यानंतरही प्रशासनाला हाताशी धरून बिनधास्तपणे खानावळी सुरू केल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही अनेक कँटीन सुरू ठेवल्या जात आहेत. येथे मार्केटमधील व बाहेरील परप्रांतीय कामगार जेवणासाठी येत आहेत. घुसखोरांना व्यापाºयांच्या गाळ्यामध्ये आश्रय मिळत असून, सार्वजनिक प्रसाधनगृहामध्ये अंघोळीपासून कपडे धुण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कमी पैशांमध्ये धर्मशाळा उपलब्ध झाली आहे. पोलीस व एपीएमसी प्रशासन संबंधितांवर काहीच कारवाई करत नसल्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी मार्केटमध्ये वास्तव्य करत आहेत. बांगलादेशी नागरिक, खून, दरोडा, चोरीमधील अनेक आरोपींनी फळ बाजारामध्ये अभय घेतल्याचे यापूर्वीच निदर्शनास आले आहे. पोलिसांनीही या विषयी अनेक वेळा बाजार समितीला पत्र दिले असूनही काहीही कारवाई केली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गुन्हा दाखल होऊ शकतोनियमाप्रमाणे भाडेकरूची माहिती पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक आहे; परंतु फळ मार्केटमधील एकही परप्रांतीय घूसखोराची माहिती पोलीस स्टेशनला देण्यात आलेली नाही, यामुळे ज्या गाळ्यांमध्ये परप्रांतीय कामगार राहतात, त्यांच्यावर व बाजार समितीच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. सामाजिक संघटनांनी पोलीस आयुक्तांकडेही तक्रारी करण्याची तयारी सुरू केली आहे.सार्वजनिक सुविधांवर ताणघुसखोरांमुळे बाजार समितीमधील सार्वजनिक सुविधांवर ताण पडत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. दीड हजारांपेक्षा जास्त नागरिकांना पाणी, प्रसाधनगृह व इतर सुविधा पुरविताना यंत्रणेवर ताण पडला आहे. मलनि:सारण वाहिन्यांमधून पाण्याचा योग्य निचरा होत नाही.गांजाविक्रेत्यांनाही अभयमार्केटमध्ये गांजाविक्रीचा व्यवसाय करणारे दोन गुन्हेगार मार्केटमध्ये वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले आहे. काहींनी प्रसाधनगृह चालविण्याचा ठेका घेतला होता. काही मार्केटमध्ये राहून व काही मार्केटमध्ये गवत उचलण्याच्या कामाचा दिखावा करून गांजाविक्रीचे रॅकेट चालवत आहेत.ओळखपत्र नाहीमार्केटमध्ये मुक्कामाला असलेल्या १५०० पेक्षा जास्त घुसखोरांकडे कोणतेच ओळखपत्र नसल्याचे पाहणीमध्ये आढळून आले. उत्तरप्रदेशमधील रहिवासी असून, गाळ्यांमध्ये मालाची चढ-उतार करण्याचे काम करत असल्याचे अनेक कामगारांनी सांगितले; परंतु प्रत्यक्षात अनेक जण पश्चिम बंगालमधील रहिवासी आहेत. बाजार समिती प्रशासन, व्यापारी व पोलीस कोणाकडेही एकही कामगाराची नोंद नाही.फळ बाजारात आतापर्यंत घडलेले गुन्हे२००६ पासून २०० पेक्षा जास्त बांगलादेशींना अटक२००६ मध्ये पाम बीच रोडवरील भगत तलावाजवळ झालेल्या खुनातील आरोपींना फळ मार्केटमधून अटकमे २०१४ मध्ये २ लाख ६४ हजार रुपयांच्या नकली नोटांसह जॉन्ही शेख, सानुल्लाह शेखसह तीन आरोपींना फळ मार्केटजवळ अटकएप्रिल २०१८ मध्ये मुंबई गुन्हे शाखेने शफीकुल शेखला दोन हजार रुपयांच्या नकली नोटांसह अटक केली तो फळ मार्केटमध्ये काम करत होता.आॅगस्ट २०१० मध्ये साडेचार लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणी हर्षल दासला अटक, फळ मार्केटमध्ये नियमित वावर होता.डिसेंबर २०१३ मध्ये फळ मार्केटमधील नूर शेखने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यामुळे अटकजुलै २०१७ मध्ये फळ विक्रेत्याच्या हत्येप्रकरणी मुन्ना खान याला अटक करण्यात आली.फळ मार्केटमधील पहिल्या मजल्यावरील पतसंस्थेमध्ये दरोडा टाकून एक कर्मचाºयाला जखमी केले होते.आॅगस्ट २०१८ मध्ये जे विंगमध्ये पाच लाख रुपयांची घरफोडी झाल्याची घटनाआरोग्यावर परिणामपरप्रांतीय कामगारांनी मोकळ्या जागांचा प्रसाधनगृहांप्रमाणे वापर सुरू केला आहे. याशिवाय मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असल्याने सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनानेही यापूर्वीच बाजार समितीला अनेक वेळा नोटिसा दिलेल्या आहेत.
फळ मार्केट परप्रांतीयांना आंदण, एपीएमसीमधील गंभीर वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 2:43 AM