सर्व्हिस रोड पूर्ण होण्याअगोदरच उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:49 AM2018-07-16T02:49:09+5:302018-07-16T02:49:11+5:30
पनवेल-सायन महामार्गालगतचा मॅक्डोनॉल्ड-मार्बल मार्केटमधून तळोजा लिंक रोडला मिळणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.
कळंबोली : पनवेल-सायन महामार्गालगतचा मॅक्डोनॉल्ड-मार्बल मार्केटमधून तळोजा लिंक रोडला मिळणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. असे असताना तयार झालेला रोड उखडला आहे, त्यामुळे वाहने चालविणे जिकिरीचे बनत चालले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी एकता सामाजिक सेवा संस्थेने केली आहे.
कळंबोली बाजूने कळंबोली सर्कल ते तळोजा लिंक रोड या दरम्यान अडीच कि.मी. लांबीचा सर्व्हिस रोड कित्येक वर्षांपासून प्रस्तावित होता. कळंबोलीकरांच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच कामोठे आणि कळंबोली या दोन वसाहती यामुळे अधिक जवळ आल्या. मार्बल मार्केट आणि लिंक रोडवर जाण्यासाठी हा जवळचा आणि सुरक्षित मार्ग आहे. याकरिता कळंबोलीतील रहिवाशांना बरोबर घेऊन आत्माराम पाटील यांनी पाठपुरावा केला होता, त्यानुसार सिडकोने नियोजन आणि आराखडा तयार केला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. सिडकोने ठेकेदारही नियुक्त केला; परंतु हे काम परवडणार नसल्याचे पाहून ठेकेदाराने माघार घेतली. तसेच सिडकोकडे जी अनामत रक्कम भरण्यात आली होती, ती जप्त करण्यात येऊ नये, या उद्देशाने त्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे हा रोडच न्यायप्रविष्ठ झाला असल्याने काम रखडले होते. रोडपाली तसेच कामोठे येथील रहिवाशांना चारचाकी किंवा दुचाकीने मुंबईच्या दिशेने जायचे असेल तर थेट कळंबोली येथील सब-वे गाठावा लागतो.
न्यायालयात आपली भक्कम बाजू मांडली. सिडकोचा युक्तिवाद मान्य करून उच्च न्यायालयाने संबंधित एजन्सीला काम करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार मार्बल मार्केट परिसरात कामाला सुरुवात केली. गेले काही महिने काम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराची मुदत संपली तरी काम पूर्ण झालेले नाही. उलट पावसामुळे तयार झालेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पुरुषार्थ पेट्रोल पंपाजवळ एका मार्गिकेची चाळण झाली आहे. मार्बल मार्केटमध्ये या सर्व्हिस रोडची अवस्था फार चांगली नाही. कामोठे सिग्नलजवळही काही प्रमाणात खड्डे आहेत. केएलई कॉलेज तसेच शिवसेना शाखेजवळ तर रस्ता दिसत नाही. मॅक्डोनॉल्ड हॉटेलसमोर खड्डेच खड्डे दृष्टिक्षेपास पडतात, त्यामुळे या रस्त्याचा नेमका फायदा काय झाला, असाही प्रश्न एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी उपस्थित केला आहे.
>या रस्त्याचे साडेसात कोटी रुपये बजेट होते. मात्र, ठेकेदाराने ३८ टक्के बिलाने निविदा भरली आणि ती मंजूरही झाली. न्यायालयाच्या आदेशामुळे त्याने काम केले. मात्र, ते फक्त दाखविण्यापुरते. दर्जा सांभाळला नाही, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल पंपाजवळ रस्ता आहे की नाही, असा प्रश्न पडतो.
- आत्माराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कळंबोली