उरण : जेएनपीटी परिसरात होणारी वाहतूककोंडी आणि सर्व्हिस रोडच्या प्रश्नाबाबत गुरुवारी मनसेच्या शिष्टमंडळाने जेएनपीटी अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जेएनपीटी बंदर उभारणीनंतरही परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाढत्या रहदारीमुळे अपघातांच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. त्यासाठी चौथ्या बंदराच्या उभारणीपूर्वी सर्व्हिस रोड बनविण्याच्या मागणीसाठी मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांचीही भेट घेतली होती. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्या वेळी सर्व्हिस रोड बनविण्याचे आणि करळ रेल्वे फाटक खुले करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासनानंतरही अद्याप करळ रेल्वे फाटक खुले करण्यात आलेले नाही, तसेच सर्व्हिस रोडचाही प्रश्नही सुटला नाही. त्यामुळे दोन्ही समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी आणि जेएनपीटीचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारत मुंबई कंटेनर टर्मिनलच्या कार्यालयासमोर ३ जानेवारी रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. उपोषणाची दखल घेऊन जेएनपीटी अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी गुरुवारी मनसेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले होते. जेएनपीटी प्रशासन भवनात मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित मुद्द्यावर चर्चा केली. चर्चेत मनसेचे जिल्हा सचिव केसरी पाटील, उरण विधानसभा अध्यक्ष विजय तांडेल, उरण शहर अध्यक्ष जयंत गांगण, सोनारी सरपंच शोभा म्हात्रे, रूपेश पाटील, अभिजित कडू, वैभव भगत तसेच जेएनपीटीचे प्रबंधक एन. के. कुलकर्णी, नॅॅशनल हायवे अॅथोरिटीचे मॅनेजिंग टेक्निशियन आर. एम. जिरांगे तसेच जेएनपीटीचे अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
सर्व्हिस रोड, अवैध पार्किंगवर चर्चा
By admin | Published: January 13, 2017 6:25 AM