BJP Ganesh Naik ( Marathi News ) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर उमेदवारीच्या शोधात नेत्यांकडून होणाऱ्या पक्षांतरांनी वेग पकडला आहे. बहुतांश आमदार सत्ताधारी महायुतीसोबत असल्याने महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये निर्माण झालेल्या संधीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते या पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच आता नवी मुंबईतील भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक हेदेखील भाजप सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपने ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ आपल्या कुटुंबासाठी न सोडल्यास गणेश नाईक हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा विचार करू शकतात, अशी माहिती आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेश नाईक यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपकडून स्वत: गणेश नाईक वगळता त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणालाही विधानसभा किंवा लोकसभेचं तिकीट देण्यात आलं नाही. तसंच सत्ता मिळाल्यानंतरही गणेश नाईक यांना मंत्रिपदी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे नाईक कुटुंब हे नाराज होते. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही इच्छुक असलेल्या संजीव नाईक यांना डावलण्यात आले. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक आपल्या स्वगृही परतू शकतात.
नाईकांनी भाजप सोडल्यास महापालिकेतही बसणार फटका
गणेश नाईक यांचं नवी मुंबईसह आसपासच्या परिसरावर राजकीय वर्चस्व आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतही त्यांच्या विचाराचे सर्वाधिक नगरसेवक होते. त्यामुळे गणेश नाईक यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्यास भविष्यात महापालिका निवडणुकीतही भाजपला फटका बसणार आहे.
दरम्यान, गणेश नाईक आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.