रखडलेल्या पगारासंदर्भात निर्णयासाठी समिती स्थापन
By admin | Published: February 14, 2017 04:26 AM2017-02-14T04:26:29+5:302017-02-14T04:26:29+5:30
पनवेल शहर महानगरपालिका १ आॅक्टोबर २०१६ पासून अस्तित्वात आली. पालिकेत तालुक्यातील एकूण २३ ग्रामपंचायतींचा समावेश
पनवेल : पनवेल शहर महानगरपालिका १ आॅक्टोबर २०१६ पासून अस्तित्वात आली. पालिकेत तालुक्यातील एकूण २३ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या ग्रामपंचायतींच्या एकूण ३८४ कामगारांचे पगार जवळजवळ पाच महिन्यांपासून रखडले आहेत. काही ग्रामपंचायतीत नोकरभरतीत अनियमितता आढळून आल्याने पनवेल महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात स्थगिती दिली आहे. हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला असून पगारासंदर्भात निर्णयासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली
आहे.
कामगारांच्या रखडलेल्या पगारामुळे अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही ग्रामपंचायतीत महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी अचानक झालेल्या नोकरभरतीची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पगार काढण्यास स्थगिती दिली होती. मात्र खारघर येथील ‘संवाद आयुक्तांशी’ या कार्यक्र मात खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष गायकर यांनी ३८४ कामगारांच्या रखडलेल्या पगारासंदर्भात आयुक्तांना प्रश्न विचारला असता, त्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगून लवकरच कामगारांना पगार मिळेल, असे सांगितले.
सफाई कामगारांसह, प्लंबर, क्लार्क, वाहनचालक, स्वच्छता निरीक्षक, लेखनिक आदींचे पगारही रखडले आहे.
काळुंद्रे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागात असलेल्या अविनाश म्हात्रे या कामगाराचा नुकताच मृत्यू झाला आहे. याचप्रकारे अनेक कामगारांवर आजारावर उपचार करण्यासाठी देखील पैसे नसल्याने यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून पात्र कामगारांना लवकरात लवकर पगार द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी आयुक्तांकडे केली आहे.
(प्रतिनिधी)