नवी मुंबई : कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होणा-या दहा ठिकाणी लॉकडाऊन करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या परिसरातील 70712 घरांमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत.
नवी मुंबई मधील कोरोनाचा आकडा 5853 झाला असून आतापर्यंत 194 जणांचा मृत्यू झाला आहे. मनपा क्षेत्रातील परिस्थितीचा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या बैठकीला खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्त संजय कुमार, महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ उपस्थित होते. सद्यस्थितीमध्ये शहरात 34 कंटेनमेंट झोन आहेत. हे झोन रूग्ण सापडलेल्या घर किंवा इमारतीमधील मजल्यापुरते मर्यादित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दहा विशेष कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
यामध्ये दिवाळे गाव, करावे गाव, तुर्भे स्टोअर, तुर्भे सेक्टर 21, 22, जुहूगाव सेक्टर 11, बोनकोडे गाव, कोपरखैरणे गाव सेक्टर 19, रबाळे गाव व चिंचपाडा परिसराचा समावेश आहे. 29 जून ते 5 जुलै दरम्यान या परिसरात विशेष लॉकडाऊन राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. महानगरपालिका या दहा ठिकाणच्या 70712 घरांमध्ये जावून सर्वेक्षण करणार आहे. कोणीही संशयित रूग्ण सापडल्यास त्याची स्वॅब टेस्ट केली जाणार आहे.
विशेष कंटेनमेंट झोन व तेथील घरांची संख्या
विभाग घरांची संख्या
दिवाळे गाव 3700
करावे गाव 9400
तुर्भे स्टोअर 11220
सेक्टर 21तुर्भे 6000
सेक्टर 22 तुर्भे 8950
सेक्टर 11 जुहुगाव 9000
बोनकोडे गाव, सेक्टर 12 खैरणे 5015
सेक्टर 19 कोपरखैरणे गाव 9600
रबाळे गाव 2918
चिंचपाडा 4900
एकूण 70712