अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी अभय कुरुंदकरला सात दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 03:46 PM2017-12-08T15:46:20+5:302017-12-08T15:48:33+5:30
महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ठाणे सुरक्षा शाखेमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवी मुंबई - महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ठाणे सुरक्षा शाखेमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी गुरुवारी अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली. पनवेल पोलिसांनी ठाण्यातून अभय कुरुंदकरला अटक केली होती. आज न्यायालयात हजर केलं असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गेल्या दीड वर्षापासून अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता आहेत.
अश्विनी बिद्रे यांचे वडिल जयकुमार बिद्रे यांनी उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार केली होती. अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. अखेर पोलिसांनी कारवाई करत अभय कुरुंदकरला अटक केली. पण पोलिसांना कारवाईसाठी दीड वर्ष का लागली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे - गोरे बेपत्ता प्रकरण गेल्या दीड वर्षापासून राज्यभर गाजत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील अश्विनीचा २००५ मध्ये हातकणंगलेमधील राजू गोरे याच्याशी विवाह झाला होता. २००६ मध्ये ती स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊन उपनिरीक्षकपदी पुणे येथे रुजू झाली. तेथून सांगली येथे बदली झालेली असताना तिची ओळख पोलीस अधिकारी अभय कुरूंदकर याच्याशी झाली. त्यांच्यामध्ये जवळीकता वाढत गेली. २०१३ मध्ये बढती मिळाली व रत्नागिरीमध्ये बदली झाली. तेथे कर्तव्यावर असताना कुरूंदकर त्यांना भेटण्यासाठी वारंवार जात होता. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते, परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले होते.
कुरूंदकरने तिच्या पतीलाही गायब करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. दरम्यान, तिची बदली नवी मुंबईमध्ये झाली होती. ११ एप्रिल २०१६ मध्ये ती कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यासाठी घरातून गेली, परंतु प्रत्यक्षात पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलीच नाही. तिचा भाऊ आनंद बिद्रे यांनी याप्रकरणी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये अभय कुरूंदकरविरोधात ३१ जानेवारी २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानेच महिला अधिकारी यांना बेपत्ता केल्याचा संशय व्यक्त केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतरही संशयित आरोपी कुरूंदकरला अटक करण्यात आली नव्हती. याप्रकरणाचा नातेवाइकांनी पाठपुरावा केला होता. अश्विनी रत्नागिरीमध्ये असताना कुरूंदकर तिला भेटायला यायचा. त्यादरम्यान त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली होती. भांडणाचे व्हिडीओ तयार करून अश्विनीने ते तिच्या संगणकावर जतन करून ठेवले होते. घरातील सीसीटीव्हीमध्ये दोघांच्या प्रेमाचे व भांडणाचे संवाद चित्रित झाले आहेत. याविषयी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ठाणे सुरक्षा शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अभय कुरूंदकरला अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड करत आहेत.
व्हिडीओ पोलिसांच्या हाती
बेपत्ता सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे - गोरे हिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर मारहाण करत असल्याचा व्हिडीओ नातेवाइकांनी पोलिसांकडे दिला आहे. त्या व्हिडीओमध्ये रत्नागिरीमधील घरामध्ये कुरूंदकर अश्विनीचा गळा दाबत असल्याचा व हाताने बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तिच्या हातामधील मोबाइलही हिसकावून घेतल्याचे दिसत आहे. इतरही अनेक व्हिडीओ तिच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे दिले आहेत.