नवी मुंबई : मागील काही महिन्यांपासून विविध जातींच्या सापाचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचे दिसून आले आहे. विशेषत: खाडीकिनाºयाच्या वसाहतीत अशाप्रकारच्या सापांचा अधिक प्रमाणात संचार आढळून आला आहे. शनिवारी घणसोली येथील जेट्टी परिसरात एक सात फूट लांबीचा अजगर आढळून आला. सर्पमित्राच्या साहाय्याने या अजगराला पकडून गवळीदेव डोंगरावरील जंगलात सोडून देण्यात आले.
सुरेश मल्हारी खरात, रा. अर्जुनवाडी, घणसोली, असे या सर्पमित्राचे नाव आहे. शनिवारी सकाळी घणसोली जेट्टी खाडीकिनारी श्री चेरेदेव परिसरात हा सात फूट लांबीचा अजगर दिसून आला. खाडीकिनारी असलेल्या खारफुटीतून हा अजगर मच्छीमारांच्या निवारा शेडजवळ येत असल्याचे मच्छीमार दिलीप हासू पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित सर्पमित्र सुरेश खरात यांच्याशी संपर्क साधला. सर्पमित्र खरात यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अवघ्या काही मिनिटांत या सात फुटी अजगराला ताब्यात घेतले. या अजगारचे वजन साधारण १३ किलो इतके असल्याचे सांगण्यात आले.
दुपारी या अजगराला घणसोली येथील गवळीदेव डोंगरावरील घनदाट जंगलात सोडून देण्यात आले. घणसोली आणि ऐरोली परिसरात विविध जातीचे साप आढळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अनेकदा भरवस्तीतही साप आढळून येत आहेत. सर्पमित्रांच्या मदतीने या सपांना जीवदान दिले जात आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून सर्पमित्रांना महत्त्व वाढले आहे. स्थानिक पोलीस, समाजसेवक, तसेच अग्निशमन दलाकडून सर्पमित्रांना कोणत्याही वेळी पाचारण केले जाते. सुरेश खरात यांनी मागील काही वर्षांत विषारी आणि बिनविषारी, अशा शेकडो सापांना जीवदान दिले आहे.