सातशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

By admin | Published: February 9, 2017 04:56 AM2017-02-09T04:56:04+5:302017-02-09T04:56:04+5:30

यादवनगर व देवीधाम नगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. महापालिका व एमआयडीसीने संयुक्तरीत्या ही

Seven hundred unauthorized slums fell | सातशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

सातशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

Next

नवी मुंबई : यादवनगर व देवीधाम नगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. महापालिका व एमआयडीसीने संयुक्तरीत्या ही कारवाई करून त्या ठिकाणच्या सुमारे ६०० झोपड्या, तर १५० हून अधिक दुकाने पाडण्यात आली असून त्यामध्ये भंगाराच्या दुकानांचा सर्वाधिक समावेश आहे. तर येत्या काही दिवसांत शहरातील इतर ठिकाणच्या झोपड्यांवरही बुलडोझर चालवला जाणार आहे.
‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमादरम्यान पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यादवनगर येथील अनधिकृत झोपड्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. अतिक्रमणाचा भस्मासुर कुठेतरी थांबला पाहिजे, अशी गरज व्यक्त करत सन २००० नंतरच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई अटळ असल्याचाही इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशीच यादवनगरमधील अनधिकृत झोपड्यांवर पालिकेने हातोडा मारला आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेली ही कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू होती. यादरम्यान यादवनगर व देवीधाम नगर परिसरातील ७००हून अधिक अनधिकृत झोपड्या व भंगाराची दुकाने पाडण्यात आली. वर्षभरापूर्वीही त्या ठिकाणी कारवाईचा प्रयत्न झाला होता. मात्र, झोपडीधारकांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे कारवाई टळली होती; परंतु बुधवारी अत्यंत नियोजनबद्धरीत्या कारवाईला सुरुवात झाल्यामुळे रहिवाशांना विरोधाची संधीच मिळाली नाही. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात झोपड्या पाडण्यात आल्या.त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरातील साहित्य वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त होता. शहरात प्रथमच अनधिकृत झोपड्यांवर मोठ्या स्वरूपाची झालेली ही कारवाई असून, यापुढेही ती सुरूच राहणार असल्याचा इशारा पालिकेने कारवाईच्या माध्यमातून दिला आहे. अनधिकृत बांधकाम झालेले भूखंड एमआयडीसीचे असून, नियोजन प्राधिकरण म्हणून पालिका त्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरवत आहे; परंतु अनधिकृत बांधकामांमुळे पालिकेवर सुविधांचा अतिरिक्त ताण पडत आहे. अशातच त्या ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयाची तोडफोड करून विद्युत दिवे चोरले जात असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. याचाही आयुक्त मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमादरम्यान आढावा व्यक्त केला होता. त्यानंतरच पालिकेतर्फे शहरातील सर्वच ठिकाणच्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाईचे नियोजन केले असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील इतरही ठिकाणच्या २००० नंतरच्या झोपड्यांवर हातोडा पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. कारवाईवेळी काही झोपड्यांमध्ये मोठमोठ्या मशिन आढळून आल्या आहेत. त्यांचा वापर नेमका कशासाठी केला जात होता याचा उलगडा झालेला नसला, तरी त्यावरून अनधिकृत झोपड्यांमध्ये उद्योगही चालवले जात होते ही बाब समोर आली आहे. बहुतांश झोपड्या बांबू व पत्र्याच्या साहाय्याने उभारण्यात आलेल्या होत्या. तर काही ठिकाणी विटांचे पक्के बांधकामही करण्यात आले होते. त्यापैकी ज्यांच्याकडे २००० पूर्वीच्या वास्तव्याचे मूळ पुरावे आहेत, अशांना वगळून इतर सर्व बांधकामे पाडण्यात आली. ही कारवाई सुरू असतानाच अनधिकृतरीत्या उभारलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचीही पळापळ झाली; परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने पालिकेने शाळेच्या अनधिकृत बांधकामाला तात्पुरता दिलासा दिला आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष संपताच शाळेवरही कारवाई केली जाणार आहे.
हटवलेल्या बांधकामांमध्ये तबेल्यांचाही समावेश आहे. रस्त्यालगत अथवा मोकळे भूखंड बळकावून त्यावर हे तबेले उभारण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Seven hundred unauthorized slums fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.