नवी मुंबई : विमा योजनेच्या नावाखाली रायगड जिल्ह्णामधील ३,६५० विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ७ लाख ३० हजार रुपये घेऊन पळून गेलेल्या एजंटविरोधात पाच पोलीस स्टेशनांमध्ये गुन्हे दाखल झाले असून, नवी मुंबई व रायगड पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. यामधील प्रमुख संशयित आरोपी के. सी. शर्मा याने पेण, खालापूर, खोपोली, रसायनी व उरण तालुक्यामध्ये विविध शाळांच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन शासनाने आम आदमी विद्यार्थी विमा योजना सुरू केली असल्याचे सांगितले होते. एलआयसीच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांचा पूर्णपणे मोफत विमा काढण्यात येणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याने फक्त २०० रुपये नोंदणी शुल्क भरायचे असल्याचे सांगितले होते. अनेक शाळांमधील व्यवस्थापनाने एजंटवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास सुरुवात केली होती. परंतु या योजनेविषयी अधिकृतपणे सरकारचे कोणतेही पत्र आले नसल्यामुळे काही शिक्षकांना शंका आली. शिक्षकांनी एलआयसी कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता, अशाप्रकारे कोणतीही योजना नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. विमा योजनेच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच रायगड जिल्ह्णातील पाच शाळांमधील व्यवस्थापनाने अनुक्रमे पेण, खालापूर, खोपोली, रसायनी पोलीस स्टेशनांमध्ये संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामधील उरण पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्णातील आरोपी के. सी.शर्मा याचा शोध घेण्यासाठी रायगड पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. नवी मुंबई पोलिसांनीही त्याला शोधण्यासाठी पथक तयार केले आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वास रायगड व नवी मुंबई पोलिसांनी व्यक्त केला आहे. या आरोपीने अजून कोणत्या शाळांमधील विद्यार्थ्यांची फसवणूक केली असेल तर संबंधितांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणामध्ये एका आरोपीचे नाव पुढे आले असले तरी या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा समावेश आहे, याबाबतही माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाकडून संबंधित व्यक्तीची माहिती घेतली आहे. त्याचे संपर्क क्रमांक व इतर माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापणाने कोणत्याही शासकिय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यासाठी एजंटशी संपर्क साधू नये. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांकडून उकळले सात लाख
By admin | Published: January 20, 2016 2:06 AM