तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीचा सात गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:59 AM2019-11-11T00:59:19+5:302019-11-11T00:59:21+5:30
तळोजा परिसरातील काही गावे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात.
कळंबोली : तळोजा परिसरातील काही गावे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. मात्र, या ठिकाणी जाणे अनेकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ही गावे जवळच्या पोलीस ठाण्याला जोडण्यात यावीत, असा प्रस्ताव पनवेल तालुका भाजपने राज्य शासनाला दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने हा प्रस्ताव गृहसचिवांकडे पाठवला आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे यांचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे. शहरी भागाबरोबरच पनवेल तालुक्यातील अनेक गावे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. २००७ पर्यंत ग्रामीण हद्द रायगड पोलिसांकडे होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली हा परिसर होता; परंतु त्यानंतर हा भाग नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकाराखाली जोडण्यात आला. २०१३ मध्ये खांदेश्वर, कामोठे हे दोन नवीन पोलीस ठाणे झाले. त्यामुळे पूर्वीच्या पनवेल शहर आणि कळंबोली पोलीस स्टेशनची हद्द विभागली गेली; परंतु पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे क्षेत्र आहे इतकेच राहिले. खालापूर, पेण आणि ठाणे हद्दीपर्यंत या पोलिसांची सीमा आहे. १०० पेक्षा जास्त गावांतील कायदा आणि सुव्यवस्था त्यांना पाहवी लागते. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर ताण येतो. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठीसुद्धा गैरसोयीचे आहे. पोलीस ठाण्यात जाण्याकरिता किमान १५ कि.मी. अंतर पार करावे लागते. मोठ्या प्रमाणात वेळ, पैसा वाया जातो. एखादी तक्रार करायची तर थेट तालुका पोलीस ठाण्यात जावे लागते. तसेच गावात काही भांडण-तंटा झाला, चोरी-दरोड्याचे गुन्हे घडले तर तालुका पोलिसांना वेळेत येथे पोहोचता येत नाही. बीट अधिकारी किंवा हवालदार नियुक्त केले असले तरी त्यांना अनेक मर्यादा येतात. यामुळे खाकीचा धाक गुन्हेगार, अवैध धंदा करणाऱ्यांवर राहत नसतो.
पासपोर्टसह इतर कामांकरिता तालुका पोलीस स्टेशनला जावे लागते. बाजूला तळोजा पोलीस स्टेशन असले तरी नागरिकांना पनवेलला जावे लागत असल्याने त्रास होतो. यासंदर्भात भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी आणि कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अजोय मेहता यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रस्ताव गृहविभागाचे सचिव संजयकुमार यांच्याकडे पाठवला आहे. त्याचबरोबर रणवरे यांनी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहायक आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्यासह स्थानिक पोलीस स्टेशनना पत्र दिले आहे.
>या गावांची होते गैरसोय
कोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, हेदुटणे, चिंध्रण, वावंजे, खैरणे ही गावे तळोजा पोलिसांत आहेत. मात्र, त्यांची हद्द पनवेल तालुका पोलीस ठाण्यात येते. बाजूलाच पोलीस स्टेशन असताना त्यांना थेट १५ कि.मी. दूर जावे लागते.
>पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीमधील काही गावे अंतराने लांब आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यानुसार याबाबत वरिष्ठ पातळीवर आम्ही कळवले आहे. ही गावे तळोजा पोलीस स्टेशनला जोडण्यात यावीत, ही मागणी आमच्याकडे आली आहे. त्यानुसार वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.
- रवींद्र गिड्डे,
सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग