वंडर्स पार्कमधील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींना अवकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 02:44 AM2018-09-22T02:44:35+5:302018-09-22T02:44:43+5:30
नवी मुंबई महापालिकेने नेरुळमध्ये निर्माण केलेल्या वंडर्स पार्कमधील जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींची दुरवस्था झाली
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने नेरुळमध्ये निर्माण केलेल्या वंडर्स पार्कमधील जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी मोडतोड झाली आहे. पालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे या पार्कमधील प्रेक्षणीय बनलेल्या प्रतिकृतीची डागडुजी केली जात नसून त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहराच्या आकर्षणात भर घालणाºया आणि शहराचे नावलौकिक वाढविणाºया नेरुळ सेक्टर १९ मधील वंडर्स पार्क उद्यानात येणाºया नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्कमधील विजेवर चालणारी खेळणी पावसाळ्यात बंद असताना देखील पार्क फिरायला येणाºया नागरिकांची संख्या घटलेली नाही. पार्कच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतातील आग्रा शहरातील यमुना नदीकाठी असलेले ताजमहाल स्मारक, दगड, विटा, माती, लाकूड आणि अन्य सामग्रीने बनविलेली चीनमधील भिंत, ग्रीकमधील पेट्रा, इटलीमधील रोम शहरातील काँक्रीट आणि दगडाच्या साहाय्याने बनविलेले अंडाकृती आकाराचे खुले थिएटर म्हणजेच कलोसियम, ब्राझीलमधील येशू ख्रिस्ताचा पुतळा म्हणजेच क्रि स्तो रेदेंतोर, मेक्सिकोमधील पुरातनशास्त्र मंदिर म्हणजेच चिचेन इस्ता, दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशातील मास्कू पिक्तसू जगातील अशा या सात आश्चर्र्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. तसेच या प्रतिकृतींशेजारी फलकाद्वारे या वास्तूंची माहिती देखील देण्यात आली आहे. वंडर्स पार्कमधील येणारे नागरिक या ठिकाणी लावलेल्या प्रतिकृतींना भेट देतात. प्रतिकृती पाहिल्यावर नागरिकांना फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही त्यामुळे या ठिकाणी फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली जाते. २0१२ साली या पार्कचे लोकार्पण करण्यात आले आहे तेव्हापासून या प्रतिकृतीची डागडुजी करण्यात आली नाही त्यामुळे या वास्तूंची दुरवस्था झाली आहे. ऊन, पाऊस आणि वारा अशा खुल्या वातावरणात आश्चर्र्यांच्या प्रतिकृती असल्याने त्यांचा रंग खराब झाला आहे, तसेच अनेक ठिकाणी मोडतोड देखील झाली आहे. काही प्रतिकृतींचा पृष्ठभाग उखडला असून त्यांची डागडुजी न झाल्यास आणखी नुकसान होण्याची शक्यता देखील वाढली आहे. पार्कमध्ये पालिका प्रशासनाने बनविलेल्या या वास्तूंची देखभाल होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून या प्रतिकृतींची महापालिकेने डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात पालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
>ताजमहालच्या प्रतीकाची दुरवस्था
भारतातील आग्रा शहरात बादशहा शहाजहॉंने आपली राणी मुमताज बेगमच्या स्मृत्यर्थ ताजमहाल बांधला होता. आकर्षक व सुंदर ताजमहल ही वास्तू प्रेमाचे प्रतीक म्हणून जगात प्रसिद्ध असून जगातील सात आश्चर्यांपैकी ताजमहाल एक आश्चर्य आहे. नेरु ळ येथील वंडर्स पार्कमध्ये जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतींमध्ये ताजमहालची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे. ताजमहालच्या प्रतिकृतीमुळे पार्कमध्ये येणाºया नागरिकांना भुरळ पडत असून या प्रतिकृतीची देखील मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी ऊन, वारा आणि पाऊस अशा वातावरणामुळे अनेक ठिकाणी भेगा देखील पडल्या असून रंग खराब झाला आहे.
>१७ लाख नागरिकांनी दिली भेट
१५ डिसेंबर २०१२ ला उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून प्रतिदिन हजारो नागरिक उद्यानाला भेट देत आहेत. आतापर्यंत तब्बल १७ लाख ७६ हजार ५५४ नागरिकांनी तिकीट काढून उद्यानाला भेट दिली आहे. यामध्ये १४ लाख प्रौढ व ३ लाख ६८ हजार लहान मुलांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अभ्यागत व लग्नासह इतर कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेतल्यास ती
१८ लाखपेक्षा जास्त होत आहे.
>जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती हे या पार्कचे आकर्षण आहेत. परंतु या प्रतिकृतींची दुरवस्था झाली असून पालिकेने डागडुजीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- प्रगती गावडे, सीवूड