अपघातानंतर सीवूडवासीयांमध्ये तीव्र असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 01:11 AM2019-06-07T01:11:40+5:302019-06-07T01:12:36+5:30
सर्व्हिस रोड बंद करण्याची मागणी : एनएमएमटी बसेस उभ्या करण्यासही विरोध : स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा आग्रह
नवी मुंबई : सीवूडमध्ये झालेल्या अपघातानंतर रहिवाशांमध्ये पोलिसांसह पालिका प्रशासनाच्या उदासीनतेविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पामबीचला लागून असलेला सर्व्हिस रोड वाहतुकीला बंद करण्यात यावा. एनएमएमटीच्या बसेस डेपोमध्ये हलविण्यात याव्या व स्टंटबाजीसह वाहने शिकण्यासाठी येणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. येथील प्रश्न तत्काळ सुटले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सीवूड सेक्टर ४६ मध्ये कारने धडक दिल्यामुळे अमोल पाटील या तरुणाचा मृत्यू झाला. या धक्क्यामुळे घटनास्थळी असलेली अमोलची आई ललिता पाटील यांचा रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. घटनास्थळी असलेली अडीच वर्षांची मुलगी सुदैवाने वाचली. या घटनेमुळे सीवूड परिसरावर शोककळा पसरली आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच ही घटना घडली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. अपघात झालेल्या सर्व्हिस रोडवर अक्षर चौक ते एनएमएमटीच्या कंटेनर केबिन कार्यालयापर्यंतच्या या रोडवर रोज २ हजारपेक्षा जास्त नागरिक चालण्याचा व सायकल चालविण्याचा व्यायाम करण्यासाठी येत असतात. या रोडवर काही तरुण मोटारसायकलस्वार स्टंटबाजी करत असतात. वेगाने मोटारसायकल चालविणाºयांमुळे अपघात होण्याची भीती नागरिकांना वाटत असते. महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसही येथे रोडवर उभ्या केल्या जातात. वास्तविक सेक्टर ४४ मध्ये स्वतंत्र बसडेपो तयार करण्यात आला आहे. परंतु डेपोऐवजी सेक्टर ४६ ए मध्ये रोडवर बसेस असतात. तेथे कर्मचाºयांसाठी कंटेनर केबिनही तयार केले आहे. मागणी करूनही बसेस येथून हलविल्या जात नाहीत. या रोडवर अनेक नागरिक मोटारसायकल व कार शिकण्यासाठी येत असतात.
त्यांच्यामुळेही येथे अपघाताची शक्यता निर्माण होत असते.
सीवूडमधील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या रोडवरील स्टंटबाजी व अतिवेगाने वाहने चालविणाºयांवर नियंत्रण ठेवले असते. रोडवर ठिकठिकाणी स्पीडब्रेकरसह रम्बलर बसविले असते तर सोमवारी रात्रीचा अपघात झाला नसता अशी प्रतिक्रियाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. सीवूडमधील वाहतुकीच्या समस्यांकडे पोलीस व महानगरपालिका प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करत आले आहे. नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडेही दुर्लक्ष केले जात असल्यामुळेच अपघात झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई केलेली नाही. या सर्वांमुळे रहिवाशांमधील असंतोष वाढू लागला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनीही पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग, महानगरपालिका प्रशासन, एनएमएमटी प्रशासन या सर्वांकडे येथील प्रश्न सोडविण्याची व आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
अपघात झालेला सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद झाला पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांची भावना प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सह्यांची मोहीम राबविली होती. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. - दत्ता घंगाळे, जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा
नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी बंद केला पाहिजे. एनएमएमटीच्या बसेसही येथे उभ्या करण्यास बंदी करणे आवश्यक असून, त्यासाठी परिवहन व्यवस्थापनाशीही चर्चा केली आहे. हा रस्ता चालण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी राखून ठेवावा.
- विशाल डोळस, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस
अपघात झालेल्या रोडवर स्टंटबाजी करणारे मोटारसायकलस्वार व वेगाने कार चालविणाºयांवर कारवाई झाली पाहिजे. या रोडवर फक्त सायकलला परवानगी दिली जावी. स्पीड ब्रेकर बसवावे, एनएमएमटीच्या बसेस तेथून सेक्टर ४४ च्या डेपोमध्ये हलविण्यात याव्यात व इतर उपाययोजना करण्यात याव्यात. - समीर बागवान, विभागप्रमुख, शिवसेना
कुटुंंबाचा आधार हरविला
सीवूड सेक्टर ४८ मधील साईसंगम सोसायटीमध्ये राहणारा अमोल पाटील एशियन पेंट्समध्ये नोकरी करत होता. त्याला दोन वर्षांची मुलगी आहे. अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे पाटील कुटुंबीयांचा आधार हरविला आहे. आई ललिता पाटील या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून संपूर्ण सीवूड परिसरासह पाटील यांच्या सांगलीमधील आगळगाव परिसरावरही शोककळा
पसरली आहे.