रोह्यात पाणीटंचाईची भीषण समस्या
By admin | Published: April 8, 2016 01:47 AM2016-04-08T01:47:48+5:302016-04-08T01:47:48+5:30
महाराष्ट्रभर सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या रोहा तालुक्यात जाणवू लागली आहे. तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील उसर गावानजीक डोंगराळ
शशिकांत मोरे, धाटाव
महाराष्ट्रभर सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या रोहा तालुक्यात जाणवू लागली आहे. तालुक्यातील खारगाव ग्रामपंचायत हद्दीतील उसर गावानजीक डोंगराळ अतिदुर्गम भागात असलेल्या ठाकूरवाडीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी अक्षरश: दीड ते दोन कि.मी.पायपीट करावी लागते. याठिकाणी गावालगत तीन विहिरी आहेत, मात्र या तिन्ही विहिरींनी तळ गाठल्यामुळे ग्रामस्थानी टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.
खारगाव ग्रामपंचायत हद्दीत महसुली गावांमध्ये खारगाव, गौळवाडी, तारेघर, खारी, उसर, तळवली तर्फेघोसाळे या सहा गावांचा समावेश आहे. तर केळदवाडी, उसर-फणसवाडी आणि ठाकूरवाडी या तीन वाड्यांचा समावेश आहे. यातील ठाकूरवाडीमध्ये ५७ घरे असून अंदाजे २५० लोकसंख्या आहे. या गावात ३ विहिरी आहेत तर यापैकी एका विहिरीचे बांधकाम ढासळले असून झाडे, झुडपाच्या गर्तेत असलेल्या या विहिरीवर पाणी भरणे मात्र गावकऱ्यांना धोकादायक होऊन बसले आहे. मार्च महिन्यानंतर विहिरीतील पाणी तळ गाठल्याने पाण्याची कमतरता जाणवते. महिलांना पाण्यासाठी गावानजीकच्या डोंगरातून झऱ्याचे पाणी आणण्याकरिता किमान ४ कि.मी. चा प्रवास करावा लागतो. तर पाळीव प्राण्यांमध्ये गुरांना, शेळी मेंढ्यांनाही पाणी नसल्याने गावापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या कुंडलिका नदीच्या खाडीतून आपली तहान भागवावी लागत आहे. कित्येक दिवस पाण्याकडे नजरा लावून बसलेल्या येथील ग्रामस्थांना बुधवारी (६ एप्रिल) पहिला टँकर गावासाठी आला.
>ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे त्या गावांकडून पाण्यासाठी आलेले प्रस्ताव विचारात घेऊन जिल्हाधिकारी शीतल उगले यांची मंजुरी घेऊनच त्या गावांना त्वरित पाणीपुरवठा करण्यात येईल.
- ऊर्मिला पाटील,
तहसीलदार, रोहा