डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध
By admin | Published: March 24, 2017 01:19 AM2017-03-24T01:19:00+5:302017-03-24T01:19:00+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्त नवी मुंबईमध्येही बंदचे आयोजन केले होते.
नवी मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्त नवी मुंबईमध्येही बंदचे आयोजन केले होते. शहरातील बहुतांश डॉक्टरांनी बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवला होता. अतिदक्षता व अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्त इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी खासगी डॉक्टरांनीही आंदोलनामध्ये सहभाग घेतला. बाह्य रुग्ण विभाग बंद करण्यात आला होता. डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश निकम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पोलीस आयुक्तांनाही मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा. हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. वैद्यकीय सेवा देणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवला असला, तरी अत्यावश्यक सुविधा सुरू ठेवल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आंदोलनास चांगला पाठिंबा मिळाला असल्याचेही स्पष्ट केले.
आयुक्तांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात अध्यक्ष डॉ. आजिज महाते, संगीता श्रीवास्तव, अशोक पाटील, सुहास साठे, अजय ठिगळे व इतर डॉक्टर उपस्थित होते.