कळंबोली : कामोठे वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ३२ सोसायट्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक सेक्टरमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. सिडकोचे नियोजन नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
कामोठे वसाहतीची लोकसंख्या अडीच लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे साहजिकच येथील पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भविष्यात ती आनखी वाढण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून कामोठे वसाहतीला पाणी दिले जाते. कळंबोली येथून ही जोडणी आहे. या वसाहतीची मागणी ४२ एमएलडी इतकी आहे. परंतु तुलनेत पाणी कमी मिळत आहे. त्यामुळे रहिवाशांना आवश्यक तितके पाणी मिळत नाही. त्यातच पाणी जोडणी केंद्रापासून जी वाहिनी टाकण्यात आली आहे, त्याची क्षमता कमी असल्याने कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्याचबरोबर वसाहतीत पाणी साठवणूक करण्याकरिता जलकुंभ नाहीत. त्यामुळे आणीबाणीच्या काळात पाणी मिळत नाही. सेक्टर ५, ६, ७, ८, ९, १०, १४, १९, २१, २२, ३४, ३६ या ठिकाणी टंचाई म्हणजे जास्त दाबाने पाणी येत नाही. काही ठिकाणी पिण्याइतपर्यंतही पाणी येत नाही. तसेच इतर अडचणी येत आहेत. चाकरमानी महिलांना तर खूप त्रास होत आहे. याबाबत एकता सामाजिक संस्थेकडून सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला पत्रव्यवहार केला आहे. सिडकोने याकरिता जास्त व्यासाची पाइपलाइन टाकण्याची मागणी आम्ही केली असल्याचे संस्थेचे सदस्य अल्पेश माने यांनी सांगितले.कामोठे वसाहतीत पाणी कमी दाबाने का येते? तसेच तेथे पाण्याच्या तक्र ारी का आहेत, याविषयी पाहणी केली जाईल. त्यानंतर येथील प्रश्न निकाली काढण्याकरिता प्रयत्न केले जातील. सर्व ठिकाणी पाणी व्यवस्थित वितरित व्हावे असा आमचा प्रयत्न असेल. - गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग