देहरंग धरण परिसरात तीव्र पाणी टंचाई ;पाण्याअभावी आदिवासी बांधवांची परवड
By वैभव गायकर | Published: April 24, 2024 05:39 PM2024-04-24T17:39:09+5:302024-04-24T17:39:50+5:30
टँकर शिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही.
वैभव गायकर,पनवेल: शहरातील पाणी टंचाईबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होते.मात्र शहरापेक्षा ग्रामीण भाग,वाड्या वस्त्या याठिकाणी पाण्याची समस्या आणखी भीषण बनली आहे.टँकर शिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही.देहरंग धरण जवळ असुन देखील येथील पाच ते सहा आदिवासी वाड्या तहानलेल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव संबोधले जाते.या निवडणुकीच्या प्रचारात राजकारणी गुंतले असल्याचे चित्र पनवेल मध्ये आहे.देहरंग धरण परिसरात मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत वाघाची वाडी,कोंबल टेकडी,औसाची वाडी,सतीची वाडी,धामणी,कोंड्याची वाडी आदी आदी आदिवासी वाड्या आहेत.गावात पाणीच येत नसल्याने या रहिवाशांना टँकरने अथवा डोक्यावर हंड्याच्या दुरी घेऊन धरणातून पाणी आणावे लागत आहे.एकीकडे प्रचंड उकाड्यात पाण्याची मागणी वाढत असताना या आदिवासी वाड्यामधील रहिवासी पाण्या अभावी त्रस्त झाले आहेत.शहरी भागात एका फोन वर टॅंकरचा पाणी उपलब्ध होतो.याकरिता रहिवाशांची हजारो रुपये मोजायची तयारी असते मात्र हातावर पोट असलेले आदिवासी बांधव पैसे आणणार कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या आदिवासी वाड्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देहरंग धरणातुन पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो त्याच धरणाच्या पाण्यासाठी या आदिवासी बांधवाना कसरत करावी लागते अशी अवस्था या आदिवासी वाडीतील बांधवांची आहे.
जलजीवनची कामे अर्धवट -
तालुक्यात जलजीवन मिशनची कामे अर्धवट असल्याने आदिवासी बांधवाना अद्याप पिण्याचे पाणी मिळू शकलेले नाही.टँकरच्या पाण्यावर आदिवासी बांधवांची तहान भागवावी लागत आहे.