नवी मुंबई : सारसोळे गावामधील मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सेक्टर ६ मधील गटारांची सुधारणा व पदपथ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर शहरातील इतर विकासकामे करण्यासही प्राधान्य दिले आहे. सारसोळे गाव व सेक्टर ६ मधील विकासकामे मार्गी लावण्यासाठी माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
महानगरपालिकेने या परिसरातील कामांना प्रत्यक्षात सुरुवात केली आहे. प्रभाग ८६ मधील गावदेवी मंदिर ते प्रेमनाथ म्हात्रे यांच्या घरापर्यंत मलनि:सारण वाहिनी टाकण्यात येत आहे. येथील नागरिकांच्या हस्ते या कामास सुरुवात करण्यात आली. सेक्टर ६ मधील मल्हार हॉटेल ते साईधाम सोसायटीसमोरील गटर, पदपथाचे नूतनीकरण करण्याचे कामही करण्यात येत आहे. याशिवाय सारसोळे गावातील दत्ता वैती यांच्या घरापासून ते बबन वैती यांच्या घरापर्यंत पदपथ बनविण्याचे कामही पालिकेच्या वतीने सुरू करण्यात आल्याचेही सूरज पाटील यांनी सांगितले.