नवी दिल्ली : एखाद्या पुरुषाने तृतीयपंथी व्यक्तीची छेड काढणे हाही भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४-ए नुसार लैंगिक अत्याचारच होतो, अशी भूमिका घेत दिल्ली पोलिसांनी एका प्रकरणात तसा गुन्हाही नोंदविला आहे. यामुळे कायद्याला नवा पैलू मिळाला असून, देशात अशा प्रकारे नोंदलेला हा बहुधा पहिलाच गुन्हा असावा.कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका तृतीयपंथी व्यक्तीने कॅम्पसमध्ये मुले छेड काढतात म्हणून राजोरीगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली; परंतु तृतीयपंथी व्यक्तीची छेड काढणे हा दंड संहितेनुसार गुन्हा ठरत नसल्याने ही तक्रार दिवाणी स्वरूपाची आहे, असे म्हणून पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याास नकार दिला होता.पोलिसांच्या या नकाराविरुद्ध तिने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली. केवळ लिंगाच्या आधारावर पोलिसांनी आपल्याला सापत्न वागणूक देणे हा आपल्या मूलभूत हक्कांवर घाला आहे. खासकरून सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथींना स्वतंत्र तिसरे लिंग म्हणून मान्यता दिल्यानंतर व त्यांना आपली लैंगिक ओळख स्वत: ठरविण्याचा अधिकार दिल्यानंतर पोलिसांची ही कृती पूर्णपणे बेकयादा ठरते, असे प्रतिपादन याचिकेत करण्यात आले होते.कायद्यातील नवे कलमदिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार व खून प्रकरणांनंतर दंड विधानात ज्या दुरुस्त्या केल्या गेल्या त्यात ३५४-ए हे नवे कलम अंतर्भूत केले गेले. त्यानुसार पुरुषाने स्त्रीशी सलगी करणे, तिची छेड काढणे, तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करणे किंवा तिच्याविषयी अश्लील शेरेबाजी करणे हाही लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ठरविण्यात आला. आता या प्रकरणाने या कलमाची व्याप्ती वाढली असून, महिलांप्रमाणेच तृतीयपंथी व्यक्तीची छेड काढणे यालाही हेच कलम लागू झाले आहे.
तृतीयपंथीची छेड काढणे हाही लैंगिक अत्याचारच, दिल्ली पोलिसांनी नोंदविला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 6:11 AM