सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : सेंट्रल पार्कच्या नावाखाली पालिकेने उद्ध्वस्त केलेल्या घणसोलीतील सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. प्रकल्पबाधितांनी सेंट्रल पार्कलगतच्याच भूखंडावर पुनर्वसनाची मागणी केली आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात स्थानिक आमदारांच्या समवेत पालिका आयुक्तांसोबत बैठक निश्चित करण्यात आली असून, त्यात तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.सेंट्रल पार्कसाठी भूखंड आरक्षित असल्याच्या कारणावरून घणसोली येथील सावली गाव उद्ध्वस्त करून दहा वर्षांचा कालावधी होत आला आहे, तर तीन वर्षांपूर्वी त्याठिकाणी सुरू झालेल्या पार्कच्या पहिल्या टप्प्याचे देखील काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तिथल्या मूळ ग्रामस्थांच्या घरांसह लगतच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आलेली. या वेळी सदर गावठाणाच्या जागेच्या हक्कावरून देखील ग्रामस्थांनी सिडको व महापालिकेला आव्हान दिले होते; परंतु ग्रामस्थांचा विरोध डावलून त्यांची घरे पाडण्यात आलेली. त्यामुळे सावली गावातील मूळ ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात देखील लढा सुरू ठेवला आहे; परंतु पुनर्वसनाचा तिढा सुटत नसल्याने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरू केले आहेत. हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात महानगरपालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्यासोबत सावली ग्रामस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये पुनर्वसनाचा तिढा सुटेल, असा विश्वास पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पबाधितांकडून व्यक्त होत आहे.सावली गाव हटवल्यानंतर तिथला ४४ हजार १२४.९३ चौ.मी.चा भूखंड सिडकोने सेंट्रल पार्कसाठी हस्तांतर करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र सिडकोने एकूण ५८६४ चौ. मी. क्षेत्रफळाचे तीन भूखंड वगळून उर्वरित ३८ हजार २६०.९३ चौ.मी. भूखंड पालिकेला हस्तांतरण केला. त्यात तीनपैकी एका भूखंडावरच पुनर्वसन व्हावे असे प्रकल्पबाधित सावली ग्रामस्थांचे म्हणणे आहे; परंतु सावली गावठाणातील सुमारे १५ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी २५ गुंठे भूखंडाची आवश्यकता आहे. तेवढ्या क्षेत्रफळाचा एकत्र भूखंड सेंट्रल पार्कलगत नसल्याने एक पूर्ण भूखंड तर दुसºया अर्धा भूखंड पुनर्वसनासाठी वापरला जावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या भावना पालिका व सिडकोपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. तसेच पार्कच्या जागेतून वगळलेले इतरही भूखंड पालिकेच्या ताब्यात मिळावे याची देखील मागणी सिडकोकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावली ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा तिढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 2:13 AM