लोकमत सखी मंच आयोजित श्रावण सोहळ्यात सखींची धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 05:28 AM2018-08-28T05:28:39+5:302018-08-28T05:29:22+5:30
‘स्टार प्रवाह’च्या सहकार्याने आयोजन : ‘विठूमाऊली’मधल्या रुक्मिणीने जिंकली मने
नवी मुंबई : सणवार, व्रतवैकल्ये, पूजाअर्चा आणि निसर्गाचे बहरलेले सौंदर्य यांचे एकत्रीकरण म्हणजे श्रावण होय. या श्रावणाचा आनंद सखींना आपल्या मैत्रिणींसोबत उपभोगता यावा म्हणून लोकमत सखी मंचच्या वतीने शनिवारी सायंकाळी शिवविष्णू मंदिर सभागृह, वाशी येथे ‘श्रावण सोहळा’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनोरंजन आणि परंपरा यांचा सुरेख मेळ साधणाऱ्या या कार्यक्रमाचा सखींनी मनोमन आनंद लुटला.
गर्द हिरवी साडी आणि महाराष्ट्रीयन नथ, पाना- फुलांचा कल्पकतेने वापर करून तयार केलेल्या आभूषणांनी नटलेल्या सखी, मजेदार उखाणे, संस्कृतीचा वसा पुढील पिढीला समजावून सांगणारे मंगळागौरीचे खेळ, श्रावणाचे विविध रंग रेखाटलेले बहारदार नृत्य, स्टार प्रवाहच्या रुक्मिणी सोबतच्या गप्पा- टप्पा आणि बक्षिसांची लयलूट अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम सखींवर आनंदाची उधळण करणारा ठरला. स्टार प्रवाहच्या ‘विठूमाऊली’ या मालिकेतील रुक्मिणी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. स्टार प्रवाह हे या सोहळ्याचे सहप्रस्तुतकर्ता होते.
स्टार प्रवाहची महाराणी, विनोदी उखाणा यासारख्या स्पर्धा यावेळी उत्साहात पार पडल्या. भाग्यश्री आर्यमाने यांनी या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. क्वीन आॅफ सखी मंच, सीवूड्सतर्फे सादर करण्यात आलेल्या पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांनी कार्यक्रमात रंगत आणली.
या वेळी उखाणा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. यात मृणालिनी वानखडे, डॉ.प्रगती जगताप, सायली ठगवेकर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय तर यामिनी भारसे, हेमा दळवी यांनी उत्तेजनार्थ अशी पारितोषिके पटकावली. कुणाल रेगे यांनी उत्कृष्ट संचालन केले.
स्टार प्रवाहची महाराणी : स्टार प्रवाहची महाराणी ही अनोखी स्पर्धा घेण्यात आली. नृत्य, फॅशन शोच्या माध्यमातून स्वत:चा परिचय, उखाणा आणि परीक्षकांची फेरी या तीन फेºयांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण स्वत: स्टार प्रवाहच्या ‘विठूमाऊली’या मालिकेतील रुक्मिणी यांनी केले. प्रत्येक फेरीत उत्तम कामगिरी करणाºया आरती राऊळ या ‘स्टार प्रवाहची महाराणी’ ठरल्या. वैशाली मुके, हेमा दळवी, जुतिका भोसले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
स्टार प्रवाहच्या ‘विठूमाऊली’ या मालिकेतील रुक्मिणी यांनी सखींशी मनमोकळा संवाद साधून या धकाधकीच्या जीवनात ज्या उत्साहाने सर्वजणी स्पर्धामध्ये सहभागी होतात त्याबद्दल सखींचे विशेष कौतुक केले.
सखींनी त्यांच्यासोबत सेल्फी काढत या अविस्मरणीय सोहळ्याच्या आठवणी कॅमेºयात कैद केल्या आणि श्रावण सोहळ्याचा धमाल आनंद लुटला. सेटवरच्या गमतीजमती आणि स्वत:च्या जीवनातील काही रंजक प्रसंग सांगून त्यांनी महिलांना स्वत्व, आत्मसन्मान जपण्याचा संदेश दिला.