लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : चिंचपाडा परिसरातील शंकरनगरमधील ८०० पेक्षा जास्त झोपड्या महापालिकेसह एमआयडीसीने हटविल्या आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आमचे संसार उघड्यावर आले असून सन २००० पूर्वीच्या झोपडीधारकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. चिंचपाडा व यादवनगरच्या मधील मुख्य रोडच्या बाजूला शंकरनगर वसले आहे. येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिका व एमआयडीसीकडून वारंवार कारवाई केली जात आहे. तीन दिवसांपूर्वीही मोठ्या प्रमाणात झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. एमआयडीसीची जागा त्वरित खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. परंतु रहिवाशांनी आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. रहिवासी दिनेश चौगुले यांनी सांगितले की, अनेक नागरिक १९९५ व २००० पासून येथे रहतात. कारवाईमुळे सगळ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. आम्हाला जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या असून आम्ही जायचे कुठे, न्याय मिळविण्यासाठी लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कारवाईनंतरही रहिवाशांनी अद्याप जागा सोडलेली नाही. पुन्हा झोपड्या उभ्या केल्या जावू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शंकरनगरमधील झोपड्या हटविल्या
By admin | Published: May 12, 2017 2:00 AM