नवी मुंबई - भाजीपाला, फळे यांच्या निर्यातीमध्ये अनेक अडथळे येत आहेत. या समस्या सोडविल्या पाहिजेत. परंतु केंद्र सरकार कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देत नाही अशी टिका शरद पवार यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेच्या देशस्थ मराठा भवन इमारतीच्या उद्घाटनानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की देशाचा अभ्यास केल्यास महामार्ग, विमानतळ, उद्योग यासाठी जमीनी संपादीत कराव्या लागत आहेत. जमीनी कमी होत असल्यामुळे शेतीवरील भारही कमी करण्याची गरज आहे. शेतीला अधुनीकतेची जोड दिली पाहिजे. देशात फळे, भाजीपाल्याचे उत्पादन वाढत आहे. पण निर्यातीमध्ये अडथळे निर्माण होत आहे. बांगलादेश ते युरोपपर्यंत अनेक देशातील निर्यातीमध्ये अडथळे येत असून ते प्रश्न सोडविले पाहिजेत. केंद्र सरकार कृषी क्षेत्राचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.
कांद्याला चांगला भाव मिळवून देण्यासाठी निर्यातील प्रोत्साहन देण्याची गरज आहे. साखर कारखान्यांच्या आयकर विषयी मंत्री अतुल सावे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना हा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेतल्याचे व कर न भरण्याची भुमीका घेतल्याचे स्पष्ट केले. शेती व साखर कारखान्यांशी संबंधीत प्रश्न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य दिले. हे काम करताना जे टिका करताहेत ते कुठेच नव्हते असे मतही व्यक्त केले.पत्रकारांवरील हल्ले चिंतेची गोष्टसंजय राऊत यांना आलेली धमकी व राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले ही चिंतेची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या घटना लोकशाहीसाठी योग्य नाहीत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.