शरद पवार गटही उतरणार ऐरोली-बेलापूरच्या मैदानात; विधानसभा लढण्याचा जिल्हा कार्यकारिणीचा ठराव!
By नारायण जाधव | Updated: August 8, 2024 21:02 IST2024-08-08T21:01:58+5:302024-08-08T21:02:20+5:30
बैठकीत नवी मुंबईतील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला.

शरद पवार गटही उतरणार ऐरोली-बेलापूरच्या मैदानात; विधानसभा लढण्याचा जिल्हा कार्यकारिणीचा ठराव!
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार उभे करावेत, असा ठराव पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीने मंजूर करून तो पक्षाध्यक्षांकडे पाठवला आहे. पक्षाच्या नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीची बैठक सानपाडा येथे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीत हा ठराव करण्यात आला.
बैठकीत नवी मुंबईतील पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीत शिंदेसेनेचे गुजराती समाज जिल्हाध्यक्ष अंबावी आर. पटेल यांनी गुजराती समाज कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पटेल यांची पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या हस्ते देण्यात आले.