पवार साहेब, निवृत्तीचा निर्णय घेऊन आम्हाला पोरके करू नका!
By योगेश पिंगळे | Published: May 3, 2023 01:18 PM2023-05-03T13:18:03+5:302023-05-03T13:18:51+5:30
वाशीत शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भावनिक आवाहन
योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी बुधवारी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले होते. निवृत्तीचा निर्णय घेऊन आम्हाला पोरके करू नका असे भावनिक आवाहन यावेळी कार्यकर्तांनी केले.
मुंबईत शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. पवार यांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या वयातही पवार साहेब युवकांना लाजवेल असे काम करतात. पुढील दोन दिवसांत त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. शरद पवार हे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांची ऊर्जा असून देशातील सर्व जातीधर्माचे लोक, नागरिक, महिला प्रत्येक घटकाला पवार यांच्या नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे त्यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता आणि नागरिकांची इच्छा असल्याचे नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी जी.एस.पाटील, विलास हुले, सुनीता देशमुख, माजी नगरसेवक राजू शिंदे, माजी नगरसेविका तनुजा मढवी, युवक जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे आदी सर्व सेलचे पदाधीकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.