नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी नवी मुंबईतून ८० हजार मतांची आघाडी घेतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा गणेश नाईक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काळाची पावले ओळखून नाईक यांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करावा, असा काही कार्यकर्त्यांचा सूर आहे; परंतु कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका नाईक यांनी जाहीर केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आत्मकेंद्रित पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे.
लोकसभेच्या २०१४ मधील निवडणुकीत संजीव नाईक यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघातून सुमारे ४० हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वत: गणेश नाईक यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. तर ऐरोलीतून संदीप नाईक यांना निसटता विजय मिळाला. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर नाईक यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या. नाईक भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत, याबाबत राजकीय गप्पा रंगात आल्या होत्या. याबाबत मौन बाळगून नाईकांनी कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढविला. अखेर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था दूर केली.
महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळवित नाईकांनी नवी मुंबईतील सत्ता आपल्याकडे कायम ठेवली; परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. या निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांना मागील निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा टिकाव लागणार नाही, अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली. या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला आमदार संदीप नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराममतदारांचा बदलता कल लक्षात घेऊन नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी इच्छा या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे समजते. मात्र, पराभव झाला तरी शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका नाईक यांनी या बैठकीत मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोमाने कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्याचे समजते. यावरून तूर्तास नाईक यांच्याविषयी सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.