‘ती’ बनली गर्भवती महिलांची माता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:33 AM2021-03-08T01:33:14+5:302021-03-08T01:33:36+5:30
प्रत्येक कर्तव्याची पूर्ती
सुहास शेलार
मुंबई : महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावण्याचा जमाना सरला, आता महिला पुरुषांच्या काही पावले पुढे जाऊन प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत. स्त्री म्हणजे सोशिकतेची मूर्ती, हा डाग पुसून आपल्या कौशल्याच्या बळावर जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांनी सिद्ध केली आहे. त्यापैकी काही प्रसिद्धीच्या प्रवाहात आल्या, तर काही त्यापासून दूर राहिल्या. अशाच काही अपरिचित महिलांच्या कार्यकर्तृत्त्वाला उजाळा देण्याचा प्रयत्न...
‘ती’ बनली गर्भवती महिलांची माता
कोरोनाकाळ हा आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक कसोटीचा ठरला. उपचार साहित्याचा तुटवडा, बेड्सची तोकडी संख्या, संसर्ग होण्याची सर्वाधिक भीती या आणि अशा अन्य समस्यांवर मात करीत राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी अविरत रुग्णसेवा दिली. नायगाव येथील पालिकेच्या महिला प्रसूतिगृहाच्या प्रमुख डॉ. कविता साळवे याही त्यापैकीच एक आहेत.
कोरोनाकाळात पालिकेच्या रुग्णालयांत दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांची जबाबदारी या माउलीकडे होती. कोरोना काळापासून या प्रसूतिगृहात दाखल झालेल्या सर्व गर्भवती किंवा नवजात बालके सुखरूप आपल्या घरी गेली आहेत. रात्री-अपरात्री रुग्णांचे किंवा त्यांच्या नातेवाइकांचे फोन आल्यास प्रसूतिगृहाच्या प्रमुख या नात्याने त्यांना समाधानकारक उत्तरे देणे, आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास सहकाऱ्यांना धीर देण्यासह संसाराचे चाक अखंड सुरू ठेवण्यासाठी मेहनत करणे अशी कसरत त्यांना सध्या करावी लागत आहे. यात खूप दमछाक होत असली तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या ओठावरचे हसू ऊर्जाधारी लस बनून थकवा दूर करते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सर्पमित्र नव्हे, सर्पमैत्रीण
सर्पमित्र म्हटला की स्वाभाविकपणे पुरुषाचाच चेहरा प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे येतो. सापाला न डगमगता अत्यंत शिताफीने आणि हातचलाखीने त्याला संरक्षक पिशवीत कैद करून सुरक्षित ठिकाणी सोडणारा असा तो सर्पमित्र. पण निशा कुंजू नामक तरुणीने या पुरुषी परीकल्पनेला झुगारून या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
प्राणिमात्रांवर दया हाच धर्म मानून तिने आजवर हजारो सापांसह इतर वन्य प्राण्यांचा जीव वाचवला आहे. २००५ साली तिने पहिल्यांदा साप पकडला आणि त्याला जीवनदान दिले. त्याशिवाय वीजवाहिन्या, पतंगांचा मांजा, केबल, इमारतींना बसविलेल्या लोखंडी जाळ्यांत अडकलेल्या प्राणी-पक्ष्यांना ती सुरक्षितरीत्या बाहेर काढून त्यांच्यावर उपचार करते. सरकार आणि अनेक सामाजिक संस्थांनी तिला सन्मानित केले. ‘कर्मवीरचक्र’ आणि ‘कर्मवीर पुरस्कार’ या जागतिक पुरस्कारांची ती मानकरी ठरली आहे.
दंड वसुलीत महिलाच ठरली नंबर वन !
विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यातही महिलाच आघाडीवर आहेत. मध्य रेल्वेच्या तेजस्विनी पथकातील मुख्य तिकीट तपासनीस शारदा विजय यांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास आपल्याला ते लक्षात येईल. त्यांनी गेल्या दोन महिन्यांत विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करीत मध्य रेल्वेला तब्बल तीन लाखांहून अधिक महसूल प्राप्त करून दिला. फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल करणाऱ्यांत त्यांचा पहिला नंबर लागतो. कोरोनाकाळात अनोळखी प्रवाशांकडून संसर्गाचा धोका असतानाही त्यांनी आपल्या कर्तव्यात खंड पडू दिला नाही. प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. अशावेळी तिकीट तपासनीसाला आपल्या चाणाक्ष नजरेतून अचूक व्यक्ती हेरावा लागतो. काहीजण हुज्जत घालतात किंवा एखाद्या अधिकाऱ्याला अथवा नेत्याला फोन लावून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी वेळप्रसंगी अरेला कारे म्हणत दंड वसूल करावा लागतो, असे शारदा यांनी सांगितले. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, या वयातील त्यांची तत्परता आणि धडपड केवळ महिलांनीच नव्हे, तर पुरुषांनीही अंगिकारावी अशीच आहे.