- प्राची सोनवणे।
नवी मुंबई : इयत्ता सहावीपासून तिने खो-खो खेळायला सुरुवात केली आणि अल्पायुतच राष्ट्रीय पदकावर आपले नाव कोरले. उत्कृष्ट खो-खोपटू बरोबरच ती उत्कृष्ट धावपटू आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव कोरणारी शीतल भोर नवी मुंबईतील कोपरखैरणेत राहते. खो-खोसारख्या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे परदेशात झेंडा रोवण्यासाठी शीतल सध्या कठोर परिश्रम घेत आहे.सध्या शीतल पदवीचे शिक्षण घेत असून, यापुढे ती खो-खो या खेळातच यशस्वी करिअर करणार आहे. प्रशिक्षक सुधीर थळे यांच्या मार्गदर्शनाखाली ती पहिल्यांदा स्पर्धेत सहभागी झाली. सध्या प्रशिक्षक मयूर पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे. दररोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास ती कसून सराव करते. केरळ राज्यात झालेल्या ३५व्या राष्ट्रीय स्पर्धेत शीतलने सुवर्ण पदक पटकविले आहे. गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी बजावत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. ११ राज्यस्तरीय स्पर्धा आणि ६ राष्ट्रीय स्पर्धेत शीतल सहभागी झाली असून, एक उत्कृष्ट खो-खोपटू म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेतही ती यशस्वी ठरली आहे. २०१५-१६ दरम्यान पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत शीतलने बेस्ट खेळाडूचा किताब पटविला. ग्रिफीन जिमखाना येथे ती सराव करत असून, जिमखाना तसेच मार्गदर्शिका गंधाली पालांडे यांचे सर्वतोपरी सहकार्य लाभल्याची प्रतिक्रिया शीतलने व्यक्त केली.नाशिक येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणीत ठाणे जिल्हा संघातून खेळताना शीतलने अष्टपैलू किताब पटविला तर ठाणे येथे झालेल्या राज्य अजिंक्य स्पर्धेत तिचा संघ विजयी ठरला. खो-खो स्पर्धेत संरक्षक म्हणून उभे राहण्याची शीतल भोर हिची सर्वाधिक वेळ ३.४० मिनिटे इतकी आहे. नंदूरबार, नांदेड, अहमदाबाद, नाशिक, उस्मानाबाद, रोहा, ठाणे, सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने यश मिळविले आहे.खो-खो खेळाला आता जागतिक स्तरावरही महत्त्व प्राप्त होत असून, आणखी खेळाडू तयार होणे गरजेचे आहे, असेही शीतलने सांगितले. कुटुंबीय, प्रशिक्षक आणि मार्गदर्शकांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे आजवर भरघोस यश मिळाल्याचे तिने सांगितले.खेळाबरोबरच अभ्यासातही हुशाररोजचा सराव, विविध स्पर्धांची तयारी या साºयांमध्ये वेळात वेळ काढून अभ्यास बुडणार नाही याचीही काळजी घेते. अभ्यास आणि खेळ या दोघांची सांगड घालत खेळामुळे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. शीतलने दहावी बोर्डाच्या परीक्षेत ९१ टक्के तर बारावी बोर्डाच्या परीक्षेत ८१ टक्के मिळविले.