पनवेल ग्रामपंचायतीत शेकाप,महाविकास आघाडीची सरशी; 17 पैकी 9 महाविकास आघाडीकडे
By वैभव गायकर | Published: November 6, 2023 05:31 PM2023-11-06T17:31:40+5:302023-11-06T17:32:40+5:30
भाजपला 7 तर एका जागेवर अपक्ष
वैभव गायकर
पनवेल: पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी स्पष्ट झाला.विधानसभा,लोकसभेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीची सरशी दिसून आली.17 पैकी 9 जागेवर शेकाप,महाविकास आघाडीचे थेट सरपंच निवडून आले तर 7 जागेवर भाजप आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार थेट सरपंच निवडून आला आहे.
मागील महिना भरापासून पनवेल मध्ये निवडणुकांचा उत्साह शिगेला गेला होता.पनवेल आणि उरण विधानसभे मधुन भाजपचे आमदार निवडून आले आहेत.त्यामुळे या ग्रामपंचायतीचा निकाल काही प्रमाणात भाजप विरोधीच आहे असे दिसून येत आहे.गावपातळीवर निवडणुकीत राजकीय पक्षांचा जनाधार कमी मानला जात असला तरी पनवेलच्या ग्रामीण भागात भाजपा विरोधी सूर दिसून येत आहे.नैना प्रकल्पासह स्थानिक पातळीवर अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत.
भाजपचा शहरी भागात वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आले.विचुंबे आणि देवद या ग्रामपंचायती मध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे त्याचाच फायदा याठिकाणी झाल्याचे दिसून आले.शहरी मतदारांचा कौल भाजपकडे असल्याचे या दोन ग्रामपंचायतीत पहावयास मिळाले.तर ओवळे ग्रामपंचायतीत देखील भाजप पुरस्कृत थेट सरपंच निवडून आला.नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लागुन असलेल्या दापोली ग्रामपंचायतीवर शेकाप महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवला आहे.महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार बाळाराम पाटील तर भाजपच्या वतीने प्रशांत ठाकुर यांनी या निवडणुकीची दुरा सांभाळली.
ग्रामपंचायत निवडणुकीत 83 टक्के मतदान झाले होते.17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाल्यास शेकाप,महाविकास आघाडी ने भाजपाला मात दिली आहे.आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत.
शेकाप महाविकास आघाडी
दुंदरे- सुभाष भोपी
कोन - अश्विनी शिसवे
कसळखंड -संजय घरत
दापोली - निकिता समाधान घोपकर
वाघिवली - अनिल पाटील
गुळसुंदे - मिनाक्षी जगताप
तुराडे - रंजना गायकवाड
वावेघर - गितांजली गाथाडे
गिरवले - प्रताप चंद्रकांत हातमोडे
भाजपा
ओवळे - रूपेश गायकवाड
विचुंबे - प्रमोद भिंगारकर
भिंगार - गुलाब वाघमारे
मालडुंगी - सिताराम चौधरी
सोमाटणे - तेजस्वी पाटील
न्हावे - जितेंद्र पाटील
■ गाव विकास आघाडी
चिखले - दिपाली तांडेल
■ शेकाप बिजेपी (युती)
देवद - विनोद वाघमारे