शेकापचा खटारा लढणार नवी मुंबईची निवडणूक; सर्व जागा लढण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:59 PM2020-03-13T22:59:38+5:302020-03-13T23:00:41+5:30
शहरातील जाहिरातींनीही वेधले लक्ष
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या वेळीही शेतकरी कामगार पक्ष नशीब अजमावणार आहे. सर्व १११ प्रभागांमध्ये समविचारी पक्षांशी आघाडी करून निवडणूक लढण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. खटारा चिन्हासह आम्ही येत आहोत अशा जाहिराती शहरभर करण्यात आल्या असून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. येथील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची सत्ता आहे. काही ठिकाणी शेकाप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. पनवेलपर्यंत शेकापची संघटनात्मक बांधणी चांगली असली तरी आतापर्यंत नवी मुंबईमध्ये त्यांना कधीच शिरकाव करता आला नाही. गत निवडणुकीमध्ये शेकापने उमेदवार उभे केले, पण त्यांना यश आले नव्हते. या वर्षीची निवडणूक लढण्याचाही शेकापने निर्धार केला आहे. शेकापने शहरभर आम्ही येत आहोत अशा जाहिराती लावल्या आहेत. पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शुक्रवारी वाशीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी गावठाणाबाहेर बांधलेली घरे नियमित करण्याचा प्रश्न सरकारच्या लाल फितीत अडकून पडलेला आहे. त्यातच अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे भूखंड मिळालेले नाहीत, साडेबारा टक्क्यांऐवजी केवळ पावणेनऊ टक्केच देण्यात आले. उर्वरित पावणेतीन टक्के भूखंडाचा त्वरित मोबदला मिळावा, या नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्याच्या हेतून शेकाप नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले.
सिडकोने नवी मुंबईत अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींची आजमितीस पार दुरवस्था झालेली आहे. अत्यंत धोकादायक इमारतीमध्ये रहिवासी आपल्या कुटुंबीयांसह जीव मुठीत धरून राहत असल्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असून झोपडपट्टीसह सर्व घटकांमधील नागरिकांच्या हितासाठी शेकाप कार्यरत राहणार आहे. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एस.व्ही. जाधव, कार्यालयीन सचिव राजेंद्र कोरडे, प्रा. सुधाकर जाधव, कांतीलाल जैन तसेच हिरामण पगार आदी उपस्थित होते. रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. पनवेलपर्यंत शेकापची संघटनात्मक बांधणी चांगली असली तरी आतापर्यंत नवी मुंबईमध्ये त्यांना कधीच शिरकाव करता आला नाही.