आविष्कार देसाई, अलिबागसागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी ६० जवानांचे कवच लवकरच जिल्ह्यात निर्माण करण्यात येणार असून त्यांना सरकारकडून घसघशीत मानधनही देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील २० लॅण्डिंग पॉइंट्स सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल असल्याचे नौदलाने घोषित केले आहे. पैकी १४ लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित सहा लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण अद्याप होणे बाकी आहे. याच ठिकाणी सुरक्षा रक्षक चोवीस तास सागरी किनारपट्टीचे रक्षण करणार आहेत.रायगड जिल्ह्याला १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा काळा इतिहास आहे. श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्रकिनारी आरडीएक्स उतरविण्यात आले होते. या कारणाने राष्ट्रीय सुरक्षेसाठी सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यानुसार जिल्ह्यात अस्तित्वात असणाऱ्या सुमारे अडीच हजार सागरी सुरक्षा दलाच्या बरोबरीनेच आता सागरी सुरक्षा रक्षक काम करणार आहेत.रायगड जिल्हा हा मुंबईला अगदी खेटून असणारा जिल्हा आहे. समुद्रमार्गे हे अंतर फक्त १८ किलोमीटर एवढे आहे. नौदलाने राज्याच्या ७२० सागरी किनारपट्टींचे सर्वेक्षण केले असून त्यापैकी रायगड जिल्ह्यातील २० लॅण्डिंग पॉइंट्स अतिसंवेदनशिल घोषित केले आहेत. एका लॅण्डिंग पॉइंटवर तीन याप्रमाणे येथे ६० सुरक्षा रक्षकांची गरज भासणार आहे. सुरक्षा रक्षकांना घसघशीत १४ हजार रुपयांचे तर, पर्यवेक्षकांना सुमारे १६ हजार रुपयांचे मानधन सरकारकडून देण्यात येणार आहे. जिल्हा सुरक्षा मंडळ या बाह्य यंत्रणेद्वारे ६० सुरक्षा रक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. तीन पाळ््यांमध्ये सुरक्षा रक्षक सागरी किनारपट्टीवर लक्ष ठेवणार आहेत. नौदल, तटरक्षक दल, पोलीस आणि मत्स्य विभाग यांनी संयुक्तपणे १४ लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण पूर्ण केले आहेत. सहा लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण होणे बाकी असून ते सर्व श्रीवर्धन तालुक्यातील असल्याची माहिती मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांनी लोकमतशी बोलताना दिली.सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यात जवानांचे कवच
By admin | Published: August 21, 2015 11:43 PM