नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत श्रीपतराव जवादे यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून दिलेल्या पदोन्नतीस नगरविकास विभागाने शुक्रवारी मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. ज्येष्ठतेनुसार खुल्या प्रवर्गात तात्पुरत्या स्वरूपात दाखल केलेली अनुमती याचिका आणि ७ मे २०२१ च्या शासन निर्णयावर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयास अधिन राहून डॉ. जवादे यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात येत असल्याचे नगरविकास विभागाने म्हटले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार १३ सप्टेंबर २०२३ रोजीच्या ठराव क्रमांक ५०६० व नुसार १५ सप्टेंबर २०२३ च्या आदेशानुसार वैद्यकीय अधीक्षक असलेल्या प्रशांत जवादे यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून पदोन्नती दिली होती. यानंतर शासनाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव आयुक्तांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी नगरविकास विभागाकडे पाठविला होता. त्यावर ७ मे २०२४ रोजी नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. कोविडसारख्या कठीण काळात अविरत सेवा बजावून सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या डाॅ. जवादे यांना उशिरा का होईना न्याय मिळाल्याबद्दल महापालिकेच्या आरोग्य विभागच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.