राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळी विजयी
By admin | Published: January 11, 2016 02:11 AM2016-01-11T02:11:54+5:302016-01-11T02:11:54+5:30
नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपली प्रतिष्ठा राखली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळी या अवघ्या ७६ मतांनी विजयी झाल्या आहेत.
नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने आपली प्रतिष्ठा राखली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळी या अवघ्या ७६ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या नूतन राऊत यांचा पराभव केला, तर भाजपाच्या उमेदवार सरस्वती पाटील या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या.
राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी मतदान झाले. एकूण ५0.४७ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे मतदानानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. यात राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळी यांना १८१८ तर काँग्रेसच्या नूतन राऊत यांना १७४२ मते पडली. भाजपाच्या सरस्वती पाटील यांना १0२३ मतांवर समाधान मानावे लागले. शिल्पा कांबळी यांना प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा ७६ मते अधिक पडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषित केले. दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांनी नेरूळची ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही जागा राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले होते. त्यानुसार माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांनी प्रभागात प्रचाराचा धडाका लावला होता. तर राष्ट्रवादीच्या ताब्यातून ही जागा खेचून घेण्यासाठी शिवसेना-भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, उपनेते विजय नाहटा यांनी प्रभागात तळ ठोकला होता. शेवटच्या टप्प्यात सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याने शहरवासीयांत या निवडणुकीच्या निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर प्रतिष्ठेच्या बनलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारीत निसटता विजय संपादित केला. (प्रतिनिधी)